Ganesh Chaturthi 2025 : गणपतीची प्राण प्रतिष्ठापना; यंदाच्या गणेशोत्सवासाठी जाणून घ्या शुभ मुहूर्त
महाराष्ट्रात गणेशोत्सव हा सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण मानला जातो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि घराघरात भक्तिभावाने प्राण प्रतिष्ठापना केली जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होणार असून यंदाची गणेश चतुर्थी २७ ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे याच दिवशी घराघरांत तसेच सार्वजनिक मंडळांत गणेश बाप्पाची स्थापना केली जाणार आहे.
गणपतीची प्राण प्रतिष्ठापना करण्यासाठी मध्यान्ह वेळ सर्वात शुभ मानला जातो. कारण गणेशाचा जन्म हा याच वेळी झाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे भक्तांनी या काळात प्राण प्रतिष्ठापना करणे अत्यंत मंगलकारी ठरते.
पूजा करण्यासाठी प्रथम गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवून तिचे पूजन करावे. तीन वेळा ताम्हणातील पाणी शिंपडावे, तीनवेळा आचमन करावे आणि नंतर मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करून मंत्रोच्चार करावा.
मंत्र:
"ॐ भूर्भुवः स्वः गणेशाम्बिकाभ्यां नमः, सुप्रतिष्ठितो भव, प्रसन्नो भव, वरदा भव।"
या मंत्रोच्चारासह मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाते. त्यावेळी गणपतीला पाच फुले अर्पण करावीत. शक्यतो जास्वंदाचे फूल अर्पण करणे अधिक उत्तम मानले जाते.
यानंतर भगवान गणेशाचे पाय पाण्याने धुऊन आचमन अर्पण करावे. त्यानंतर अभिषेक विधी केला जातो. प्रथम पाण्याने स्नान घालून मग पंचामृताने (दूध, दही, तूप, मध, साखर) स्नान करावे. सुगंधी तेल व शुद्ध पाण्यानेही स्नान घालून मूर्ती शुद्ध केली जाते.
मग गणपतीला मोळीच्या स्वरूपात नवे वस्त्र अर्पण करावे. पवित्र धागा, तांदळाचे दाणे, शमीची पाने, दुर्वा अर्पण करावीत. मूर्तीला तिलक म्हणून कुंकू लावावे. धूप, दीप दाखवून आरती करावी. शेवटी मोदक, लाडू आणि फळांचा नैवेद्य अर्पण करून पूजा पूर्ण करावी.
याप्रकारे योग्य पद्धतीने आणि भक्तिभावाने प्राण प्रतिष्ठापना केली की गणपती बाप्पा घरात विराजमान होतात आणि घरामध्ये सुख-समृद्धी, मंगलमयता नांदते असा भक्तांचा विश्वास आहे.
यंदा २७ ऑगस्टला होणाऱ्या गणेश चतुर्थीपासून संपूर्ण महाराष्ट्रात दहा दिवस भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळणार आहे.