काश्मीरमध्ये प्रथमच घुमणार 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाज

काश्मीरमध्ये प्रथमच घुमणार 'गणपती बाप्पा मोरया'चा आवाज

काश्मीरमधील 'गणपतीयार ट्रस्ट'मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन आम्ही हा मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

पुणे : काश्मीरमधील 'गणपतीयार ट्रस्ट'मध्ये गणेशोत्सव साजरा व्हावा, याकरिता पुण्यातील सात मंडळे एकत्र येऊन आम्ही हा मूर्ती प्रदान सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्यामुळे काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसाचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या गणेशोत्सवामुळे काश्मीर भागात सुख, समृद्धी आणि शांतता नांदेल, असे मत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त व उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी यावेळी व्यक्त केले.सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवनाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टसह पुण्यातील सहा मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येत यंदा काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार

श्रीनगर येथील गणपतयार टेम्पलचे संदीप कौल आणि शिशांत चाको यांच्याकडे पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती सार्वजनिक मंडळाच्या बाप्पाची प्रतिकृती सुपुर्त करण्यात आली. काश्मीरमध्ये यंदा दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळ, गुरुजी तालीम गणपती मंडळ, तुळशीबाग गणपती मंडळ, केसरीवाडा गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ, अखिल मंडई मंडळ या सात मंडळांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून गुरुवारी या सर्व मंडळांनी एकत्र येत कश्मीरसाठी मूर्ती दान केली. हा कार्यक्रम श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे उत्साहात पार पडला. तत्पूर्वी अभेद्य ढोलताशा पथकाचे जोरदार वादन झाले. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टचे विश्वस्त, उत्सव प्रमुख पुनीत बालन, ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, ग्रामदेवता तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, गुरुजी तालिम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी , तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, केसरी गणेशोत्सवाचे प्रतिनिधी अनिल सकपाळ, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काश्मीरमधील गणपतीयार ट्रस्टचे संदीप कौल म्हणाले, पुण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या पुढाकाराने कश्मीरमध्ये पहिल्यांदाच आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. याचा आम्हाला आनंद होत आहे. लाल चौकापासून पाचशे मीटर अंतरावर असलेल्या प्रसिद्ध गणपतयार मंदिरात येत्या गणेशोत्सव चतुर्थीला आम्ही या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठा करणार असून दीड दिवसानंतर विसर्जन केले जाईल. पहिल्यांदाच अशा पद्धतीने काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा होणार आहे. यावेळी श्रीकांत शेटे म्हणाले, देशाचा स्वर्ग कश्मीर भाग आहे, बाप्पाचा आशीर्वाद येथे वाढण्यासाठी हा बाप्पाचा आशीर्वाद म्हणून ही मूर्ती प्रदान केली आहे. उन्नत, सशक्त, शांती, सुख काश्मिर येथे नांदण्यासाठी ही बाप्पाची मूर्ती आम्ही सर्वजण एकत्र येऊन देत आहोत. यावेळी अण्णा थोरात म्हणाले, पुण्याप्रमाणेच कश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करावा, याकरिता हा पुढाकार घेण्यात आला आहे. पुण्यात सर्व धर्मिय नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, त्याप्रमाणे काश्मीरमध्ये सुध्दा गणेशोत्सव साजरा व्हा, अशी आमची भावना आहे.

"हिंदुस्तानात गणेशोत्सवाची सुरुवात पुण्यातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळकांनी केली. आज हाच गणेशोत्सव इतर देशातही साजरा होतो. मग तो आपल्याच देशात काश्मीरमध्ये का नाही? असा प्रश्न पडला आणि त्यामुळेच काश्मीरमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय आम्ही सर्व मानाच्या मंडळांनी घेतला. या माध्यमातून काश्मीर खोऱ्यात सामाजिक सलोखा वाढण्यासोबतच सुख-समृध्दीही वाढेल, असा विश्वास आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com