Gauri Khan : गौरी खान ठरली बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत पत्नी; आलिया-दीपिकालाही टाकलं मागं
बॉलिवूडमधील काही अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या पत्नी या केवळ स्टार्सची जोडीदार नसून स्वतःच्या कर्तृत्वावर भरघोस यश मिळवत आहेत. अनेकजणी विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. त्यामध्येही शाहरुख खान यांची पत्नी गौरी खान हिचं नाव अग्रस्थानी घेतलं जातं. कारण सध्या तिची एकूण संपत्ती तब्बल 1600 कोटी रुपयांहून अधिक आहे, ज्यामुळं ती बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत 'स्टार वाइफ' ठरली आहे.
गौरी खान ही एक प्रसिद्ध इंटीरिअर डिझायनर आहे. तिनं बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींच्या घरी आपला स्पर्श दिला आहे. अनन्या पांडे, करण जोहर, मनीष मल्होत्रा यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांच घर गौरीनं डिझाईन केलं आहे. 2010 साली तिनं अधिकृतपणे इंटिरिअर डिझायनिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. पुढं 2017 मध्ये 'गौरी खान डिझाइन्स' नावाचा स्वतःचा स्टुडिओ सुरू केला.
याशिवाय, ती 'रेड चिलीज एंटरटेनमेंट' या शाहरुखसोबत सुरू केलेल्या प्रोडक्शन हाऊसची सह-संस्थापक आहे. या माध्यमातूनही ती दरवर्षी शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करते. विविध ब्रँड्सची अॅडव्हर्टायझमेंट आणि एंडोर्समेंटमधूनही तिचं उत्पन्न प्रचंड आहे.
दुसरीकडे, दीपिका पादुकोण हिची एकूण संपत्ती सुमारे 500 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, तर आलिया भट्ट ही 550 कोटी रुपयांची मालकीण मानली जाते. मात्र, व्यवसायिक आणि डिझायनिंग क्षेत्रातील यशामुळे गौरी खान या दोघींनाही आर्थिकदृष्ट्या मागं टाकते.
या यादीत गौरीचा वरचष्मा कायम असून, केवळ 'स्टार वाइफ' म्हणून नव्हे, तर एक यशस्वी उद्योजिका म्हणून तिचं नाव बॉलिवूडच्या इतिहासात मानाने घेतलं जातं आहे.