मुकेश अंबानीनंतर गौतम अदानींच्या घरी लगीनघाई; पार पडला मुलाचा साखरपुडा
मुकेश अंबानींनंतर आता उद्योगपती गौतम अदानी यांच्या घरात लगीनघाई सुरु झाली आहे. गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी याची हिरे व्यापाऱ्याची मुलगी दिवा जैमीन शाह हिच्यासोबत साखरपुडा झाला आहे. दिवा ही सी. दिनेश अँड को.प्रा.चे हिरे व्यापारी जमीन शाह यांची मुलगी आहे. दिवा आणि जीत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
अहमदाबादमध्ये 12 मार्च रोजी एका खाजगी समारंभात केवळ जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. यादरम्यानचे फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये जीत आणि दिवा दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. दिवा जमीन शाह पेस्टल निळ्या रंगाचा दुपट्टा आणि भरतकाम केलेल्या लेहेंग्यात अतिशय सुंदर दिसत आहे. तर जीत तिच्या शेजारी हलक्या रंगाच्या एम्ब्रॉयडरी जॅकेटसह पेस्टल ब्लू कुर्तामध्ये उभा आहे.
दरम्यान, जीत अदानी यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शिक्षण पूर्ण केले आहे. ते 2019 मध्ये अदानी समूहात सामील झाले आणि सध्या ते ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत. अदानी ग्रुपच्या वेबसाइटनुसार, जीतने ग्रुपचे सीएफओ म्हणून करिअरची सुरुवात केली. जीत अदानी अदानी विमानतळ व्यवसाय तसेच अदानी डिजिटल लॅबचे प्रमुख आहेत. अदानी समूह आगामी काळात सुपर अॅप बनवण्याच्या तयारीत आहे.