Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन
राज्यातील अनुदानित शिक्षकांच्या वाढीव वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार चौथा टप्पा लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, जुलै महिन्याचा पगार ऑगस्टमध्ये खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलक शिक्षकांसमोर जाहीर केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला असून, आर्थिक अडचणी असूनही शिक्षकांचे हित लक्षात घेऊन ही घोषणा करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, चौथा टप्पा लागू झाल्यानंतर शिक्षकांना नियमित पगार मिळत राहिल. तसेच रिटायरमेंटपर्यंत वेतनात कोणताही विलंब होणार नाही.
शिक्षक आमदारांनी आणि शिक्षक समन्वय संघाने एकमुखीपणे 100 टक्के अनुदानाची मागणी केली होती. या मागणीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देत चौथा टप्पा तातडीने लागू करण्याचा निर्णय झाला आहे. मागील सरकारच्या काळात रखडलेला हा प्रश्न अखेर सोडवण्यात सध्याच्या सरकारने यश मिळवले आहे.
शिक्षकांनी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर पावसात आणि उन्हात शांततामय आंदोलन केले होते. सरकारने याची दखल घेतली असून, येत्या 18 जुलै रोजी अधिवेशन संपल्यानंतर 2 ते 3 दिवसांत तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून पगार शिक्षकांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
या निर्णयामागे गिरीश महाजन यांची मध्यस्थ भूमिका आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारची स्पष्ट भूमिका निर्णायक ठरली आहे. आंदोलक शिक्षकांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले असून, आता शिक्षकांनी गावाकडे परत जाऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण कार्य पुन्हा सुरू करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षकांसाठी घेतलेला हा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभर पोहोचवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. सरकारने दिलेले आश्वासन पाळले जाणार असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.