Gold Rate : दसऱ्याआधीच ग्राहकांच्या खिशाला चटका! सणासुदीच्या तोंडावर 24 कॅरेट सोनं 1.18 लाखांच्या पार
दसरा अगदी दारात आला असून या सणानिमित्त सोनं खरेदी करण्याची प्रथा जुनी आहे. मात्र यंदा सोन्याचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे अवघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढणाऱ्या सोन्याच्या भावाने तब्बल 1 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
आज पुन्हा सोन्याच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली. 24 कॅरेट शुद्ध सोनं प्रतितोळा 1,200 रुपयांनी महागलं असून त्याचा दर 1,18,640 रुपयांवर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1,100 रुपयांची वाढ होऊन तो 1,08,750 रुपयांवर गेला आहे. तर 18 कॅरेट सोनं प्रतितोळा 900 रुपयांनी वाढून 88,980 रुपयांवर पोहोचले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या या जोरदार उसळीमागे आंतरराष्ट्रीय घटक जबाबदार आहेत. अमेरिकेतील आर्थिक धोरणे आणि फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर कमी होण्याची शक्यता यामुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. त्याचा थेट परिणाम भारतातील भावावर दिसून आला आहे.
सप्टेंबर महिन्यात सोन्याने गुंतवणूकदारांना तब्बल 11.4 टक्के परतावा दिला आहे. 2011 नंतर ही सर्वात मोठी उसळी मानली जात असून गेल्या 14 वर्षांतील सर्वोच्च परतावा नोंदवला गेला आहे. यामुळे गुंतवणूकदारांना नफा झाला असला तरी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक आहे.
दरम्यान, मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्येही सोन्याचे दर जवळपास याच पातळीवर आहेत. त्यामुळे दसऱ्याच्या खरेदीत ग्राहकांना जास्त खर्च करावा लागणार आहे. अनेक जणांनी सणाच्या खरेदीसाठी पर्यायांचा विचार सुरू केल्याचे व्यापारी सांगत आहेत.