Gold Rate : सोन्याच्या दराने ग्राहकांना दिला झटका; 22 कॅरेट सोनं ‘लाखांच्या’ घरात
सोन्याने पुन्हा एकदा ऐतिहासिक झेप घेत ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचवली आहे. आज म्हणजेच शनिवार, 6 सप्टेंबर रोजी देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. 22 कॅरेट सोनं प्रथमच प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या घरात पोहोचले, तर 24 कॅरेट सोन्याचा दर तब्बल 1 लाख 08 हजार 490 रुपयांवर स्थिरावला.
ही वाढ ग्राहकांसाठी धक्कादायक ठरली असली तरी गुंतवणूकदारांसाठी मात्र सोनं पुन्हा एकदा ‘सुरक्षित आश्रयस्थान’ बनले आहे. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याचा दर 870 रुपयांनी वाढला असून एका ग्रॅमची किंमत 10,849 रुपयांवर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्यात 800 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅमचा दर 99,450 रुपयांवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम
दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उतार, अमेरिकन टॅरिफबाबतची अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीकडे वाढता कल ही प्रमुख कारणे आहेत. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीत व्याजदर कपातीची अपेक्षा असल्याने जागतिक बाजारात सोन्याच्या किमतींना बळ मिळाले आहे.
ग्राहकांवर फटका, गुंतवणूकदारांना दिलासा
ग्राहकांच्या दृष्टीने सोन्याचा दर ‘हाताबाहेर’ गेला असला तरी गुंतवणूकदारांसाठी हा प्रवास संधीचा ठरत आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, आगामी लग्नसराईत या झपाट्याने वाढणाऱ्या दरांचा थेट परिणाम होणार असून सामान्य खरेदीदारांची चिंता अधिकच वाढेल.
स्थिरावणार की अजून झेप घेणार?
सोनं-चांदीवरील जीएसटी अद्याप 3 टक्क्यांवर कायम आहे. मात्र दरांमध्ये सातत्याने होत असलेली वाढ पाहता, हा कल पुढील काही आठवडे सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात पारंपरिक दृष्ट्या सोनं ही केवळ दागिन्यांची नव्हे तर भावनिक गुंतवणुकीचीही बाब आहे. त्यामुळे दर वाढले तरी मागणी कमी होण्याऐवजी अधिकच वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.