Electricity Bill : वीजग्राहकांसाठी खुशखबर! आता 100 युनिटपर्यंत वापरावर थेट 26% शुल्क कपात; महायुतीचा दिलासादायक निर्णय
Electricity Bill : वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आता 100 युनिटच्या आत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना तब्बल 26 टक्के शुल्क कपात देण्याचा महत्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. यामुळे विजेचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर पुढील काही वर्षांमध्ये विजेच्या दरात वाढ केली जाणार नाही अशी ग्वाहीही यावेळी सरकारकडून देण्यात आली.
महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 70 टक्के ग्राहक 100 युनिटपेक्षाही कमी वीज वापरतात. त्यांना आता 26 टक्क्यांचे टेरिफ रिडक्शन, शुल्क कपात लागू करण्यात येणार आहे. यामुळे या निर्णयाचा लाभ साधारण दोन कोटींपेक्षा अधिक घरांना मिळणार आहे. वाढत्या वीज बिलांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा अत्यंत निर्णायक ठरत आहे. राज्यविधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी विजेचे वाढते बिल यावर सरकारकडे प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना 100 युनिटच्या आत वापर करणाऱ्या ग्राहकांना 26 टक्के टेरिफ कपातीची घोषणा केली. तसेच, इतर ग्राहक वर्गांनाही वीज दरात सवलतीचा लाभ देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विद्युत खरेदी आता ‘मेरीट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने केली जाणार आहे. त्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जात आहे. तसेच सोलर, विंड आणि बॅटरी स्टोरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत सुद्धा खूप कमी झाली आहे. हे दीर्घकालीन (25 वर्षांचे) करार असल्यामुळे विजेचे दर पुढील काही वर्षांपर्यत स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कृषी क्षेत्रात सुद्धा महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत. वीज वापरावर नियंत्रण असावे यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहे. यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार आहे. यामुळे कृषी क्षेत्रातील अचूक वीज वापर मोजली जाणार असून त्यामधून भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल, असेही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या (MERC) चुकीच्या आदेशांची माहिती देत, त्यात सुधारणा केली जात असल्याचेही नमूद केले.