दादा भुसे, भरत गोगावलेंना पालकमंत्रिपदावरून डावललं, गुलाबराव पाटील कडाडले
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. तर पंकजा मुंडे यांच्याकडे जालन्याची जबाबदारी दिली गेली आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन आणि रायगडला अदिती तटकरेयांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र या दोघांना पालकमंत्रिपदापासून डावलण्यात आले. यावरच मंत्री गुलाबराव पाटील कडाडले आहेत.
गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यावर अन्याय झालाय. दादा भुसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आहेत. तर भरत गोगावले हे तीन वेळा आमदार झाले आहेत. कोकणातील चेहरा आहे, त्यांना पालकमंत्रिपद मिळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, तीन पक्षांच्या सरकारमध्ये आपल्याला जनतेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले, ही दुर्मिळ गोष्ट आहे. पालकमंत्रिपदाची अपेक्षा असली तरी आपण त्याची कुठेही मागणी केली नव्हती. जिल्ह्यात आता चार मंत्री असल्याने जिल्ह्याचा चांगला विकास होईल. विकासाला आपण प्राधान्य देणार आहोत. मागील पाच वर्षात आपण जनता आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास करण्याचा प्रयत्न केला होता. मागील काळात आपल्याकडून काही चूक झाल्या असतील. मात्र, विकासकामांना आपले प्राधान्यक्रम राहिले आहे, अस ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळलं
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशात धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. अखेर त्यांचं नाव या यादीमधून वगळण्यात आलं आहे. धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रिपद देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. तरीही बीडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्रिपद भूषवणार आहेत.