33 वर्षीय व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण यशस्वी

33 वर्षीय व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल्समध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण यशस्वी

वीजेच्या अपघातात दोन्ही हात गमावले होते. अशाप्रकारे दोन्ही हात एकाचवेळी प्रत्योरोपण करणारी ही आशियातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया ठरली

रिद्धेश हातिम|मुंबई: 12 वर्षांपूर्वी झालेल्या वीजेच्या अपघातात आपले दोन्ही हात गमावलेल्या 33 वर्षीय राजस्थानी व्यक्तीवर परेलच्या ग्लोबल हॉस्पिटल येथे दुहेरी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. नीलेश सतभाई, विभाग प्रमुख - प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांट सर्जरी, ग्लोबल हॉस्पिटल, मुंबई यांच्या नेतृत्वाखालील तज्ज्ञांच्या टीमने या रुग्णाला नवे आयुष्य बहाल केले. तब्बल 16 तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया डॉक्टरांकरिता एक मोठे आव्हान होते. या शस्त्रक्रियेने ग्लोबल हाँस्पिटल्सला एक नावलौकीक मिळाले आहे.

१२ वर्षांपूर्वी अजमेर, राजस्थान येथील रहिवासी श्री प्रेमा राम शेतात काम करत असताना चुकून विजेच्या खांबाच्या संपर्कात आल्याने वीजेचा त्यांना जोरात झटका बसला. त्याला तातडीने अजमेर येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याचे प्राण वाचवण्यासाठी त्याचे दोन्ही हात कापण्याचा सल्ला दिला. कुटुंबीय त्यांना जयपूरला घेऊन गेले, पण त्यांनाही तसाच सल्ला देण्यात आला. रुग्णाच्या कुटुंबीयांनी कृत्रिम अवयव मिळविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्याला कार्यक्षम हात देऊ शकले नाहीत. प्रेमा राम यांचे हात जवळजवळ खांद्यापासून कापले गेले होते. यामुळे ते अपंग आणि परावलंबी झाले होते. कुटुंबातील सदस्य त्यांना त्याची दैनंदिन कामे करण्यास मदत करत होते.

खांद्यापासून हात प्रत्यारोपण करणे हे त्यावेळी भारतात जवळजवळ अशक्य मानले जात होते. प्रेमा रामच्या वडिलांनी युरोपमध्ये हात प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेबद्दल चौकशी केली, परंतु ती खूप महाग आणि त्यांच्या आर्थिक क्षमतेच्या बाहेर होती. प्रेमा राम यांनी हात गमावला असला तरी त्यांनी आशा सोडली नव्हती. त्यानंतर त्यांना ग्लोबल हॉस्पिटल्स, मुंबई येथे यशस्वी हात प्रत्यारोपणाविषयीची माहिती मिळाली आणि त्यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये याठिकाणी हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली.

डॉ. नीलेश सतभाई, विभाग प्रमुख - प्लास्टिक, हँड अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी आणि ट्रान्सप्लांट सर्जरी, ग्लोबल हॉस्पिटल्स, मुंबई म्हणाले की, प्रेमा राम हा रुग्ण गेल्या दहा वर्षापासून नवीन हात शोधत होता. प्रत्योरापण नोंदणीनंतर काही काळ प्रतिक्षा केल्यानंतर एका दात्याचे अवयव रुग्णाच्या हाताच्या रंगांशी आणि आकाराशी जुळले. यापूर्वी, युरोपमध्ये दुहेरी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. पंरतू, आशियातीत मात्र दुहेरी हात प्रत्यारोपण करण्याची ही पहिली शस्त्रक्रिया ठरली आहे. हात प्रत्यारोपण करणे खूप आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे होते. या प्रक्रियेदरम्यान, वेळ आणि समन्वय अतिशय महत्वाचा ठरला. जेणेकरून हातपाय शक्य तितक्या लवकर शरीराला जोडण्यात आले आणि त्वरीत रक्त परिसंचरण सुरू झाले.

प्रत्यारोपण कोप-याच्या खाली असल्यास, प्रत्यारोपणात स्नायूंचे वस्तुमान कमी असते त्यामुळे अंगांचा आकार आणि वजन कमी असते. हात मिळवणे, त्यांना तयार करणे, जोडणे, रक्तवाहिन्या जोडणे आणि रक्तपुरवठा पूर्ववत करणे हा सर्व क्रम आणि समन्वयाची प्रक्रिया परिपूर्ण असणे गरजेचे ठरते. रुग्णावर ९ फेब्रुवारी रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर 4 आठवडे रुग्णाला रूग्णालयात देखरेखेखाली ठेवण्यात आले आणि 9 मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या खांद्यावर फिजिओथेरपी करण्यात आली. पुढील 18 ते 24 महिने ही फिजिओथेरपी सुरू राहील. रुग्णाने 18 महिन्यांत हाताचे कार्य साध्य करणे अपेक्षित आहे.

मी माझे दोन्ही हात गमावल्यानंतर पूर्णतः उद्ध्वस्त झालो होतो. अंगविच्छेदनामुळे नैराश्य आले. सुरुवातीला, हे अत्यंत आव्हानात्मक होते, मी दररोज आणि प्रत्येक मिनिटाला संघर्ष करत होतो. माझी दैनंदिन कामे करण्यासाठी मला माझ्या कुटुंबीयांची मदत घ्यावी लागली. मात्र माझ्या अपंगत्वानंतरही मी हार मानली नाही. या समस्येवर काहीतरी उपाय नक्कीच मिळेल असा माझा विश्वास होता. मला सर्व सामान्य माणसाप्रमाणेच जगायचे होते. मी माझ्या पायाने गोष्टी पकडण्याचा सराव करु लागलो आणि प्रत्येक गोष्टीवर पकड निर्माण करण्याचा प्रयत्नही केला. मला आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा होता. मी माझे शिक्षण आणि बीएड परीक्षा नुकतीच पूर्ण केली. मला नवीन हात दिल्याबद्दल मी माझे कुटुंबीय, डॉक्टर आणि ग्लोबल हॉस्पिटल मुंबईच्या संपूर्ण टीमचे आभार मानतो. माझा विश्वास आहे की या जगात काहीही अशक्य नाही. मी खूप आनंदी आहे आणि स्वतःच्या हाताने सर्व कामे करण्यास उत्सुकही आहे अशी प्रतिक्रिया रुग्ण श्री प्रेमा राम यांनी व्यक्त केली.

“कृत्रिम हात अंगविच्छेदन करणार्‍यांना खूप मर्यादित कार्य प्रदान करतात. त्यांच्यासाठी सामान्य जीवन जगण्यासाठी हाताची उपयुक्त कार्यक्षमता परत मिळवण्यासाठी हात प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे. ग्लोबल हॉस्पिटल्स, मुंबई आणि पश्चिम भारतातील अग्रगण्य प्रत्यारोपण केंद्र हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून रुग्णांसाठी नाविन्यपूर्ण प्रक्रिया करते. आम्हाला या यशाचा अभिमान आहे आणि यापुढेही असेच अधिक जीवनरक्षक प्रत्यारोपण करण्याचे आणि प्राप्तकर्त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. लोकांना अवयवदान चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे अशी प्रतिक्रिया डॉ विवेक तलौलीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्लोबल हॉस्पिटल्स, परेल, मुंबई यांनी व्यक्त केली.

श्री अनुराग यादव, सीईओ IHH हेल्थकेअर इंडिया यांनी आव्हानात्मक आणि गुंतागुंतीची प्रकरणे हाती घेतल्याबद्दल संपूर्ण टीमचे कौतुक केले. “मुंबईने आत्तापर्यंत आठ हात प्रत्यारोपण पाहिले आहेत, त्यापैकी सात आमच्या हॉस्पिटलमध्ये झाले आहेत. हात प्रत्यारोपणाला बर्‍याचदा वैद्यकीय चमत्कार म्हटले जाते आणि ज्यांनी या रुग्णासारख्या अंगांचा कार्यक्षम वापर गमावला आहे त्यांच्यासाठी हे परिवर्तनकारक असू शकते. आम्ही हात दानाच्या महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्याचा प्रयत्न करतो कारण यामुळे अधिक व्यक्ती आणि कुटुंबांना अवयवदानाचा निर्णय घेताना या पर्यायाचा विचार करण्यास प्रोत्साहन मिळेल. हे गरजू लोकांचे जीवन वाचविण्यात आणि सुधारण्यात मदत करू शकते आणि त्यांची गतिशीलता आणि स्वातंत्र्य परत मिळविण्याच्या संधीची वाट पाहणाऱ्यांना आशा निर्माण करू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com