Harshvardhan Sapkal On Devendra Fadnavis : 'मी फडणवीसांच्या कामकाजावर टीका केली, माफी मागण्याचा...' सपकाळांचे वक्तव्य
औरंगजेबाच्या कबरीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल वादग्रस्त विधान केलं होत. ज्यात ते म्हणाले होते की, "औरंगजेब हा क्रूर शासक होता. आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. ते कायम धर्माचा आधार घेतात. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे". मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना औरंगजेबासोबत करत त्यांच्यावर केलेल्या टीकेवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज दिल्लीत स्पष्टीकरण दिलं आहे.
टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही-हर्षवर्धन सपकाळ
देवेंद्र फडणवीस यांचा कारभार औरंगजेबासारखाच असल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळांनी केले होते. त्यावर बोलतांना सपकाळ म्हणाले की, "मी फडणवीसांवर राजकीय टीका केली. कुठेही वैयक्तिक टीका-टीपण्णी केली नाही. माझा कुठेही तोल गेला नव्हता, देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागण्याचा प्रश्नच नाही", असं सपकाळ यांनी म्हटलं आहे.
नितेश राणे सामाजिक तेढ निर्माण करत आहेत-हर्षवर्धन सपकाळ
त्याचसोबत त्यांनी नितेश राणेंवर निशाणा साधत म्हटलं आहे की, "मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सुरु आहे. सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का?", असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थितीत केला आहे.