Maharashtra Weather : संभाजीनगर, जालना, अहिल्यानगरात वादळी पावसाचा कहर! तीन जणांनी गमावला जीव, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
राज्यात विविध ठिकाणी गुरुवारी वादळी पावसाने थैमान घातले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर आणि नांदेड जिल्ह्यांत वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, शेती व घरे यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांतील पावसामुळे एकीकडे शेतीसाठी दिलासा मिळाला असला, तरी वादळी वाऱ्यांमुळे जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून मदत व पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस पडला. मंठा तालुक्यातील उंबरखेड येथे वीज पडून शेतकरी गौतम आसाराम जाधव यांचा मृत्यू झाला. अंभोरा कदम गावात शंकर महाजन हे वीज पडून गंभीर जखमी झाले आहेत. पावसामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ गावात नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडी वाहून गेली. या दुर्घटनेत अभिनव गुमुल (5 वर्षे) या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचसोबत अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे 587 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यातील दहीफळ येथे अंगावर झाड कोसळून मीराबाई अशोक भोसले (57) या महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यात 125 घरांचे नुकसान झाल्याचेही प्राथमिक अहवालात नमूद झाले आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर शहरात गुरुवारी दिवसभर उन्हाने तापले होते. मात्र संध्याकाळी 6:30 वाजता आकाशात ढगांची दाट चादर पसरली. काही क्षणांतच गडगडाटासह मृगधारा बरसल्या, ज्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांनी सोशल मीडियावर पावसाचे व्हिडीओ व फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला.