IMD Weather Alert : रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा! मुसळधार पावसामुळे गुरुग्राम ठप्प
सोमवारी गुरुग्राममध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले आणि संध्याकाळी भीषण ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली. एनएच-48 महामार्गावर तब्बल चार किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ऑफिस सुटल्यावर हजारो नागरिकांना तासन्तास वाहतुकीत अडकून राहावे लागले.
दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे वाहनांची गती मंदावली आणि हिरो होंडा चौक ते नरसिंहपूरपर्यंत रस्त्यांवर गाड्यांचा तांडा उभा राहिला. नरसिंहपूर, सेक्टर 29, सेक्टर 31, सेक्टर 45, सेक्टर 56, डीएलएफ फेज 3 आणि पालम विहारसह अनेक भाग जलमय झाले. पाण्याने व्यापारी संकुलं व रहिवासी वसाहतींच्या बेसमेंटमध्येही प्रवेश केला.
हवामान खात्याने गुरुग्रामसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शहरात 45 मिमी पावसाची नोंद झाली. परिस्थिती पाहता प्रशासनाने शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा सल्ला दिला असून, आयटी व कॉर्पोरेट कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा देण्याचे आवाहन केले आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की पावसाळा सुरू होताच दरवर्षी अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागते. शहरातील अपुरे ड्रेनेज सिस्टम आणि अव्यवस्थित बांधकामामुळे थोड्याशा पावसातही पाणी साचते. प्रशासन आणि नगरपालिकेकडून सुधारण्याचे दावे केले जातात, मात्र प्रत्येक वेळी पावसात हे दावे खोटे ठरतात.