Mumbai-Goa Highway : चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुखकर होणार! मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना आज बंदी
मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-गोवा मार्गावर अवजड वाहनांना आज बंदी घालण्यात आली आहे. शिमग्यानिमित्त कोकणात गावी गेलेल्या चाकरमान्यांची सुट्टी आज संपते आहे. त्यामुळे कोकणात आपल्या गावी गेलेले हजारो शेकडो चाकरमनी शिमगा साजरी करून पुन्हा मुंबई शहराकडे परतत आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.
कोकणातून परतत असताना चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी आजा म्हणजे रविवारी 16 मार्च रोजी मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील कशेडी ते खारपाडा दरम्यान अवजड वाहनांना आज दुपारी 12 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अशी 24 तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच मुंबई-गोवा मार्गावर रविवारी जड-अवजड वाहनांना कशेडी ते खारपाडापर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.
तसेच खोपोलीवरून खोपोली-पालीफाटा ते वाकण महामार्ग क्रमांक ५८४ (अ) या महामार्गावरून गोवा बाजूकडे जाणाऱ्या व मुंबई बाजूकडे येणाऱ्या वाहनांसाठीही बंदी राहणार आहे. असे आदेश रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. या वाहतूक बंदीतून इंधन, स्वयंपाकाचा गॅस, भाजीपाला, औषधे, ऑक्सिजन अशा जीवनाश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे.