Bhimashankar : भीमाशंकरमध्ये लवकरच हेलिपॅडची सुविधा, 288 कोटींच्या विकास योजनेला मंजुरी
नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भीमाशंकर तीर्थक्षेत्रात भाविकांसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या 288.71 कोटींच्या आराखड्याला सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत या आराखड्याला अंतिम मान्यता देण्यात आली.
या विकास योजनेअंतर्गत भीमाशंकर परिसरात लवकरच हेलिपॅडची सुविधा निर्माण केली जाणार आहे. तसेच वाहनतळावर सुमारे 2000 चारचाकी, 200 मिनी बस आणि 5 हजार दुचाकी उभ्या राहू शकतील इतके मोठे पार्किंग विकसित होणार आहे. भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रतीक्षा कक्ष, स्वच्छतागृहे, स्नानगृहे, लॉकर, दुकाने आदी सुविधा पुरवण्यात येणार आहेत.
भीमाशंकर बसस्थानकाचे पुनर्विकास काम आणि मंदिर परिसरातील सुधारणा यामध्ये समाविष्ट आहेत. राम मंदिर आणि दत्त मंदिराची पुनर्बांधणी करण्यात येणार असून दिव्यांगांसाठी विशेष इलेक्ट्रिक वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे. राजगुरूनगरमार्गे नवीन मार्गाची उभारणी, श्री कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, ट्रेकिंग मार्गांची निर्मिती आणि पायी चालण्यास योग्य पायवाटा या विविध कामांचा या आराखड्यात समावेश आहे.
हे सर्व प्रकल्प भाविकांना सुरक्षित आणि सुलभ दर्शनाचा अनुभव देण्यासाठी राबवण्यात येणार आहेत. ही योजना पारंपरिक वारसाचे जतन करत आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करण्याचा प्रयत्न असून, भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून ती आखण्यात आली आहे.