Thailand-Cambodia Conflict : थायलंड-कंबोडिया संघर्ष ! हवाई हल्ल्यात 9 मृत्युमुखी; 118 वर्ष जुना सीमावाद पुन्हा उफाळला
थायलंड आणि कंबोडिया या शेजारी देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव अधिकच तीव्र झाला आहे. थायलंडने दोन कंबोडियन लष्करी तळांवर हवाई हल्ले केल्याची अधिकृत घोषणा केली असून, या हल्ल्यांमध्ये किमान 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सी सा केट प्रांतातील एका गॅस स्टेशनवर सहा जणांचा बळी गेला. या हल्ल्यांमध्ये किमान 14 नागरिक जखमी झाले.
कंबोडियन संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, थायलंडच्या लढाऊ विमानांनी प्रीह विहार मंदिराजवळील रस्त्यांवर बॉम्ब टाकले. हे 11व्या शतकातील मंदिर शिवजींना अर्पण केलेलं असून, याला 2008 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले होते.
हा सीमावाद 1907 मध्ये फ्रेंचांनी तयार केलेल्या नकाशावरून सुरु झाला. या नकाशानुसार प्रीह विहार मंदिर कंबोडियाच्या क्षेत्रात असल्याचे स्पष्ट होते. आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही 1962 मध्ये कंबोडियाचा हक्क मान्य केला. मात्र मंदिराभोवतालची जमीन दोन्ही देश आपली असल्याचा दावा करतात.
गुरुवारी पुन्हा एकदा ता मुएन थॉम मंदिर परिसरात गोळीबाराची घटना घडली. थायलंडने आरोप केला की, कंबोडियन सैनिकांनी नागरिकांवर हल्ले केले, तर कंबोडियाने थायलंडवर आपल्या सार्वभौमत्वावर गदा आणल्याचा आरोप केला आहे. सीमा संघर्षामुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. जागतिक समुदायाकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे.