Naigaon BDD : नायगाव बीडीडीतील ४२३ पोलिसांची गृहस्वप्नपूर्ती; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी घरचाव्यांचे वितरण
थोडक्यात
नायगाव बीडीडीतील ४२३ पोलिसांची गृहस्वप्नपूर्ती
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुधवारी घरचाव्यांचे वितरण
बीडीडी पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा
दीर्घकाळ प्रतीक्षा, आंदोलने आणि न्यायालयीन लढ्यानंतर अखेर नायगाव बीडीडी परिसरातील पोलिस कुटुंबीयांच्या गृहस्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक क्षण येऊन ठेपला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ‘नायगाव बीडीडी पुनर्विकास’ योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या पाच पुनर्वसित इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून, या इमारतीतील ८६४ घरांच्या चाव्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप येत्या बुधवारी (१२ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या घरांपैकी ४२३ घरे निवृत्त आणि कार्यरत पोलिसांना देण्यात येणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षांपासून आपल्या स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी हा दिवस खऱ्या अर्थाने ‘दिवाळीपूर्व आनंदसोहळा’ ठरणार आहे.
बीडीडी पुनर्विकासाचा महत्त्वाचा टप्पा
म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगाव बीडीडी पुनर्विकास योजनेअंतर्गत पाच पुनर्वसित इमारती बांधल्या आहेत. या ८६४ घरांना सोमवारीच निवासी दाखला (Occupation Certificate) मिळणार असून, त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चावी वाटपाचा सोहळा पार पडेल. या इमारतींमधील घरांचा ताबा दिवाळीच्या काळात देण्याचे नियोजन पूर्वी होते, मात्र निवासी दाखल्याच्या विलंबामुळे सोहळा पुढे ढकलण्यात आला होता.
४२३ पोलिसांचे गृहस्वप्न साकार
या योजनेअंतर्गत ८६४ घरांपैकी ४२३ घरे निवृत्त पोलीस आणि कार्यरत पोलिसांना देण्यात येणार आहेत. मुंबईतील वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींमध्ये पोलीस कुटुंबे दशकानुदशके राहतात. या चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेदरम्यान पोलिसांसाठी घरांची हमी मिळावी, यासाठी पोलीस कुटुंबीयांनी अनेक वर्षे सातत्याने संघर्ष केला. आंदोलने, मोर्चे, आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर सरकारने पोलिसांच्या मागण्या मान्य करत ५०० चौ. फूट क्षेत्रफळाचे घर १५ लाख रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. मुंबई मंडळाकडून या घरांसाठी १५ लाख रुपयांच्या रकमेच्या भरपाईची प्रक्रिया सध्या सुरू असून, पात्र पोलिसांना या टप्प्यात घरे देण्यात येणार आहेत.
दीर्घ संघर्षानंतर मिळाले यश
या लढ्याबाबत रेखा मोरे, नायगाव बीडीडी येथील एका पोलीस पत्नीने सांगितले, “पोलिसांना घरे मिळावीत यासाठी आम्ही मोठा लढा दिला. आंदोलन केले, मोर्चा काढला, न्यायालयात गेलो. प्रत्येक आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधक सगळ्यांना भेटलो. अखेर आमच्या लढ्याला यश आलं आहे. नायगावमधील पोलिसांचे हक्काच्या घराचे स्वप्न आता पूर्ण होत आहे, त्यामुळे आम्ही सर्व पोलीस कुटुंबीय आनंदी आहोत.”
