Sambhajinagar Crime News : मोबाईलवरून वाद विकोपाला! पतीची पत्नीला काठीनं जोरदार मारहाण; दुसऱ्या दिवशी आढळला पत्नीचा मृतदेह

Sambhajinagar Crime News : मोबाईलवरून वाद विकोपाला! पतीची पत्नीला काठीनं जोरदार मारहाण; दुसऱ्या दिवशी आढळला पत्नीचा मृतदेह

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील मोहंद्री शिवारात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली.
Published by :
Team Lokshahi
Published on

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यातील पिशोर जवळील मोहंद्री शिवारात मंगळवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. मोबाईलच्या किरकोळ वादातून शेतमजूर पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मृत महिलेचे नाव पिंकाबाई संजय देवळे (वय 27) असून, तिचा पती संजय महिकाल देवळे (रा. बोरगाव, ता. पढाना, जि. खंडवा, मध्यप्रदेश) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मोहंद्री येथील निवृत्त शिक्षक अवचितराव जाधव यांच्या शेतात गेल्या वर्षभरापासून सालगडी म्हणून काम करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री बिरोबाच्या खोऱ्यातील गट क्रमांक 221 मधील पत्र्याच्या शेडमध्ये पती-पत्नीमध्ये नवीन मोबाईलच्या मुद्यावरून वाद झाला. संजय देवळे याने 'मोबाईल कोणी दिला?', 'तो कोणाचा आहे?' याविषयी पत्नीला जाब विचारला. या वादात संतापलेल्या संजयने पिंकाबाईच्या डोक्यात काठीने जोरदार मारहाण केली आणि नंतर दुसऱ्या शेडमध्ये झोपायला गेला.

बुधवारी सकाळी शेजारील शेतकरी बाळू जाधव यांनी महिलेला गंभीर अवस्थेत पाहून शेतमालक अवचितराव जाधव यांना माहिती दिली. त्यानंतर महिलेला तातडीने पिशोर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टर अमोल गिरी यांनी तिला मृत घोषित केले.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, फॉरेन्सिक तज्ज्ञ सिताकांत पळसकर, संदीप जोनवाल आदींनी तपास करून पंचनामा केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

डॉ. गिरी यांच्या प्राथमिक अहवालानुसार, महिलेला डोक्यावर मारहाण करण्यात आली असून गळा दाबून खून केल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पती संजय देवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित फरताडे करीत आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com