Sanjay Gaikwad On UBT Andolan : "मी ओरिजनल, माझी कॉपी उबाठाच्या ..." ; आमदार संजय गायकवाडांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Sanjay Gaikwad On UBT Andolan : काहीकाळ प्रकाशझोतातून दूर राहिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा जोरदार राजकीय चर्चेत आले आहेत. आपल्या ठसकेबाज बोलण्याच्या शैलीसाठी ओळखले जाणारे गायकवाड यांनी उद्धव ठाकरे गटावर थेट निशाणा साधत वादग्रस्त विधान केले. राज्यभर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना त्यांनी स्वतःला ‘ओरिजनल’ ठरवत, "माझी कॉपी उबाठाच्या बापालाही जमणार नाही" असा जोरदार टोला लगावला.
विरोधकांना ‘रिकामचोट’ संबोधले
उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनावर भाष्य करताना गायकवाड म्हणाले,
"उबाठाच्या वतीने होत असलेलं आंदोलन म्हणजे रिकामचोट पक्षाची कृती आहे. त्यांच्याकडे आता कोणतंही काम उरलेलं नाही. माझी कॉपी ते करू शकत नाहीत. मीच ओरिजनल आहे."
ते पुढे म्हणाले, "विरोधी पक्षाने जनतेच्या खऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं. पण हे नको त्या मुद्द्यांवर आंदोलन करतात. राज्यात लोकांनी त्यांना फक्त 16 जागा देऊन त्यांचा पत्ता दाखवला आहे. जे कधी मातोश्रीच्या दारातून बाहेर पडले नव्हते, ते आता रस्त्यावर आले आहेत. आता तरी त्यांनी सुधरावं."
महायुतीत असूनही स्वबळाचा आग्रह
गायकवाड यांनी स्पष्ट केलं, "भाजपला आपला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे, तसेच मी माझ्या पक्षासाठी काम करत आहे. सर्व पक्षांना स्वतःचं काम करण्याचं स्वातंत्र्य आहे."
‘धनुष्यबाण’ चिन्हावर हक्काचा दावा
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबतचा वाद सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यावर गायकवाड म्हणाले,
"निवडणूक आयोगाने कायदेशीर धनुष्यबाण आम्हाला दिला आहे. या विधानसभेत आम्ही 61 जागांवर विजयी झालो आहोत. जनतेच्या न्यायालयाने आम्हाला जिंकवून दिलं, त्यापेक्षा मोठं न्यायालय नाही. त्यामुळे धनुष्यबाण आमचाच आहे."
राहुल गांधींना प्रत्युत्तर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतांची चोरी केल्याचा आरोप केल्यावर गायकवाड म्हणाले,
"लोकसभेत त्यांचा पक्ष जिंकल्यावर मतांची चोरी होत नाही, पण आम्ही विधानसभेत जिंकलो कीच चोरी होते का? कधी मतदान बूथवर जाऊन पाहिलं आहे का मतदान कसं होतं ते? ग्रामीण भागातील कष्टकरी संध्याकाळी 5 नंतर मतदानाला जातो, ते रात्री 10 पर्यंत चालतं. त्या प्रक्रियेत मतांची चोरी होतच नाही."
संजय गायकवाड यांच्या या तिखट विधानांमुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी त्यांचा ‘ओरिजनल’ दावा व थेट हल्ले राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.