Nilesh Muni Exclusive : 'मी मराठी समाजाची माफी मागतो' - जैन मुनी
दादर येथील कबुतरखाण्यावरील वाद आता चांगलाच चिघळलेला असून, मराठी एकीकरण समिती व जैन समाज यामध्ये वाढती तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. हायकोर्टात आज कबुतरखाण्याच्या संदर्भातील सुनावणी होणार असताना, त्या पार्श्वभूमीवर जैन मुनी निलेश चंद्र यांनी लोकशाही मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या एक्स्क्लूसीव्ह मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट करत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.
"धर्माच्या आड कोर्ट आलं तर आम्ही ऐकणार नाही"
निलेश चंद्र यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही संविधानाला मानतो, मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवतो, पण जर धर्माच्या विरुद्ध न्यायालय निर्णय देत असेल, तर आम्ही तो मान्य करणार नाही. आम्ही जैन धर्माचे आहोत, महावीर आमचा आराध्य आहे, आणि आमचं एकमेव शस्त्र म्हणजे अहिंसा आणि उपोषण. आम्ही उपोषणाचं शस्त्र उचलू.”
"आम्ही कोणावरही चाकू चालवणार नाही"
मुनींनी सहा ऑगस्ट रोजी जैन समाजाच्या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांच्या हातात असलेल्या शस्त्रांविषयीही स्पष्टीकरण दिलं. “त्या लोकांच्या हातात चाकू किंवा आरी होती, पण ती कोणाला मारण्यासाठी नव्हती. बीएमसीने लावलेल्या ताडपत्र्या आणि बांस कापण्यासाठी ती आणली होती. आमचा उद्देश केवळ कबुतरांचा जीव वाचवणे हा होता.”
"कोर्टाच्या निर्णयाला आमचा विरोध नाही, पण भावना दुखवल्या जातात"
जैन मुनी म्हणाले, “कोर्टाचा सन्मान आम्ही करतो. पण जेव्हा कोर्टाचे आदेश धार्मिक परंपरेच्या विरोधात जातात, तेव्हा आमचं मन वेदनांनी भरून जातं. आम्ही दोनशे वर्षांपासून त्या ठिकाणी दाणा टाकतो. आज त्या ठिकाणी 20 हजारांहून अधिक कबुतरं मेली आहेत. ते बघून आमच्या भावना दुखावतात.”
"जर माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो"
एका टप्प्यावर निलेश चंद्र यांनी आपलं पूर्वीचं विधान स्पष्ट करत “जर माझ्या वक्तव्यामुळे मराठी समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी 'मिच्छामी दुक्कडं' म्हणतो आणि जाहीर माफी मागतो.” असं नमूद केलं. त्यांनी सांगितलं की, “मी स्वतः मराठी घरात जन्मलेला आहे. मी पाटील आहे, पण ५ वर्षांच्या वयात जैन धर्म स्वीकारला आहे. त्यामुळे माझं मराठी समाजाशी नातं आहे.”
"मराठी आणि मारवाडीचा वाद संपवायला राज ठाकरेच सक्षम"
मुनींनी राज ठाकरे यांच्याकडे जाण्याची इच्छाही व्यक्त केली. “हा वाद केवळ कबुतरांचा राहिला नाही. आता तो मराठी आणि मारवाडी समाजात फूट पाडणारा विषय झाला आहे. हा वाद संपवण्यासाठी मी राज ठाकरे यांना भेटून विनंती करणार आहे. तेच एकमेव नेता आहेत जे हा वाद शांततेने सोडवू शकतात.”
"मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी दिलंय आश्वासन"
मुनींनी स्पष्ट केलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन समाजाच्या भावना न दुखावता योग्य तो तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयानंतरही जर न्याय मिळाला नाही, तर ते जरांगे पाटलांच्या मार्गावर चालत अन्न-जल त्याग करतील, असं त्यांनी सांगितलं.
"हा वाद निवडणुकांसाठी निर्माण केला जातोय"
ते म्हणाले की, “हा वाद बीएमसीच्या निवडणुकांपूर्वी मुद्दाम निर्माण केला जात आहे. आमचं आंदोलन केवळ कबुतरखाण्याशी संबंधित आहे, आमचा हेतू कोणत्याही समाजाशी वैर करण्याचा नाही.”
"शांततेच्या मार्गानेच आंदोलन चालवणार"
शेवटी त्यांनी आवाहन केलं की, “मी जैन समाजाला सांगतो की कोणीही हिंसक मार्ग स्वीकारू नका. कोणत्याही न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करू नका. आम्ही शांततेच्या मार्गाने, अहिंसेच्या बळावर आमचा संघर्ष चालवणार आहोत.”
निलेश चंद्र यांच्या या मुलाखतीमधून एक स्पष्ट संदेश देण्यात आला आहे – ते सरकारवर, न्यायालयावर विश्वास ठेवतात, पण धर्माच्या विरोधात कुठलाही निर्णय गेला तर ते शांततेच्या मार्गाने संघर्ष करतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा फक्त कबुतरांचा नव्हे तर दोन समाजांमधील सामंजस्य टिकवण्याचा प्रश्न झाला आहे.