'खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे' उद्धव ठाकरे बरसले
शिवसेनेची मुब्रा इथली शाखा शिंदे गटाकडून पाडण्यात आल्यानं मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे हे स्वतः या ठिकाणी भेट देण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खरा बुलडोजर काय असतो ते दाखवायला आलो आहे' असं ते म्हणाले आहेत.
ते म्हणाले की, या खोकेश्वरांनी आमच्या जागेवर खोका आणून ठेवलाय. अतिक्रमण केलंय. तो खोका आमच्या जागेवरुन लवकर उचला. नाहीतर आम्ही तिथे येवून फेकून दिल्याशिवाय राहणार नाहीत. तिथे शाखा भरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारले आहेत. आता मधमाशा कुठे डसतील बघा. मुंब्र्याच्या शाखेची कागदपत्र आमच्याकडे आहेत. गद्दारांचं डिपॉजिट जप्त करुन त्यांना घरी पाठवा. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला करा आणि या",असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी दिलं.
मुंब्र्यात जर अनुचित घडलं असतं तर महाराष्ट्राची अब्रू गेली असती. केसाला जरी धक्का लागला असता तर महाराष्ट्राने यांचे केस उपटून टाकले असते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यात येऊ नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली होती. तसेच संबंधित शाखेच्या परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्तेदेखील जमलेले होते. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी उद्धव ठाकरेंना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बॅरिकेट्सच्या पुढे जावून शाखा पाडलेल्या परिसराची पाहणी करण्यास मज्जाव केला. उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना प्रचंड विनंती केली. पण पोलिसांनी सुरक्षेचं कारण देत त्यांना बॅरिकेट्सच्या पुढे जाऊ दिलं नाही. अखेर लांबूनच शाखेची पाहणी करुन उद्धव ठाकरेंना परत फिरावं लागलं. त्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाला डिवचलं.