Supriya Sule Speech : AI तंत्रज्ञानामुळे जग बदलतंय, नवे बदल आत्मसात केले पाहिजेत : सुप्रिया सुळे
एका शैक्षणिक संकुलाच्या विशेष कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि ChatGPT सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत आपले अनुभव, फायदे आणि चिंता मांडल्या. या कार्यक्रमाला देशविदेशातील शास्त्रज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि तज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी स्वतः ChatGPT चा नियमित वापर करते. मी ChatGPT वापरते, याचा फायदा मलाही होतो.” त्यांनी AI चा वापर करताना उदाहरणही दिले – “मी GPT ला सहज विचारलं की बारामती आणि वॉशिंग्टन डीसी मध्ये काय साम्य आहे, तर उत्तर आलं की दोन्ही ठिकाणांवरून महत्त्वपूर्ण राजकीय हालचाली होतात. बारामती ही जरी अधिकृत राजधानी नसली तरी बारामती राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर आहे.” वॉशिंग्टन डीसी प्रमाणेच बारामती शहर सुद्धा शिक्षण शेती आणि इन्फ्रास्ट्रक्चर च्या बाबतीत सुधारित आहे असेही Chat Gpt ने सांगितले.
तंत्रज्ञानाचे फायदे सांगतानाच त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेवर अतीनिर्भरतेबाबत चिंता व्यक्त केली. “AI चा वापर निश्चितच उपयुक्त आहे, मात्र आपण स्वतःचा विचार करण्याची क्षमता हरवू नये. आपण जर फक्त मशीनवर आधारित राहिलो तर मानवी बुद्धीचा वापर कमी होईल,” असे त्या म्हणाल्या. भाषण करताना त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या तंत्रज्ञानाबाबतच्या दूरदृष्टीची आठवण करून दिली. हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग यांसारख्या प्रश्नांवर AI प्रभावी ठरू शकेल असा विश्वास व्यक्त केला. “AI आधारित डेटाचा सखोल अभ्यास आणि अचूक विश्लेषण हे आजच्या काळात आवश्यक आहे,” असेही त्या म्हणाल्या आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनी असेही मत मांडले की, “AI सारखे तंत्रज्ञान सर्वसामान्यांसाठी परवडणारे झाले पाहिजे. तंत्रज्ञान सतत बदलत आहे आणि त्यात सहभागी राहण्यासाठी आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावे लागेल.”सध्या विविध राजकीय नेते त्यांच्या भाषणांमध्ये AI आणि डिजिटल तंत्रज्ञानावर भर देताना दिसत आहेत. अशा पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी मांडलेले अनुभव आणि सूचनात्मक विचार विशेष महत्त्वाचे ठरतात.