PMC : पुणे महापालिका आयुक्तपदी IAS अधिकारी नवल किशोर राम यांनी नियुक्ती
पुणे महापालिकेचे विद्यमान आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले येत्या 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदावर भारतीय प्रशासन सेवेतील (IAS) अधिकारी नवल किशोर राम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, नवल किशोर राम हे 31 मे रोजी डॉ. भोसले यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
नवल किशोर राम हे 2008 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून ते मूळचे बिहार राज्यातील आहेत. 2007 साली त्यांनी भारतीय शासकीय सेवेत प्रवेश केला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या सेवेला सुरुवात झाली. यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच बीड व संभाजीनगर जिल्हाधिकारी पदावर काम पाहिले आहे.
संभाजीनगरमधील कचऱ्याच्या प्रश्नावर त्यांनी प्रभावीपणे उपाययोजना राबविल्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी पुणे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारीही यशस्वीपणे पार पाडली. विशेषतः कोरोनाच्या काळात त्यांनी पुणे जिल्ह्याचे नेतृत्व अत्यंत कुशलतेने केले.
पुढे त्यांची दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती झाली होती. आता ते केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून परत येत राज्य शासनाच्या सेवेत रुजू होत आहेत. पुणे महापालिकेच्या कारभारात प्रशासनिक अनुभव असलेले आणि लोकाभिमुख कार्यपद्धती असलेले नवल किशोर राम यांची आयुक्तपदी झालेली ही नियुक्ती पुण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.