Ravindra Chavan On Ajit Pawar : 'आम्ही आरोप करायला गेलो तर अजितदादांची अडचण होईल'; रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी प्रचार जोरात सुरू झाला असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने गेल्या सात वर्षांत प्रचंड भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण यांनी, “आम्ही जर आरोप करायला सुरुवात केली तर अजितदादांना अडचण होईल,” असा इशाराच दिला.
या पत्रकार परिषदेत रवींद्र चव्हाण म्हणाले की, अजित पवार यांनी आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहिले पाहिजे. “ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपवर आरोप करत आहेत, हे त्यांनी ध्यानात ठेवले पाहिजे. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत, याचे भान त्यांनी राखावे. आम्ही कधी आरोप करायला गेलो, तर त्यांना फार मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल,” असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
रवींद्र चव्हाण यांनी पुढे सांगितले की, यंदाची महापालिका निवडणूक ही केवळ राजकीय आरोपांपुरती मर्यादित नसून पुण्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. “पुण्यातील जनतेला दर्जेदार नागरी सुविधा कोण देऊ शकते, हा खरा प्रश्न आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार गतिमानपणे काम करत आहे,” असे ते म्हणाले. पुण्यात पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने राबवले जात असून, कोट्यवधी रुपयांचा निधी विकासासाठी दिला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पुणे मेट्रोचाही उल्लेख केला. “पुणे महापालिकेत मेट्रोचा ठराव झाला होता. मात्र केंद्र आणि राज्यात सत्ता असतानाही महाविकास आघाडीला पुण्यात मेट्रो सुरू करता आली नाही, कारण त्यांना ती करायचीच नव्हती. नरेंद्र मोदी सरकार आल्यानंतर पुण्यात मेट्रो सुरू झाली आणि आज पुण्यात ३३ किलोमीटरचे मेट्रो जाळे कार्यरत आहे,” असे ते म्हणाले. हेच विकासाचे ठोस उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने सात वर्षांत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाला असून, दोन्ही बाजूंमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राळ उडताना दिसत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत पिंपरी-चिंचवडसह पुण्याच्या राजकारणात आणखी घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
