Rules For Two Wheeler : दुचाकी घेणाऱ्यांसाठी मंत्रालयाची अधिसूचना, आता दुचाकी खरेदीवेळीच घ्यावे लागणार दोन हेल्मेट, वाचा नियम
दुचाकीस्वारांसाठी केंद्र सरकारकडून एक नवा नियम लवकरच अंमलात येणार आहे, ज्यामुळे वाहन खरेदी करताना केवळ एक नव्हे तर दोन हेल्मेट देणे बंधनकारक होणार आहे. वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासंदर्भात एक अधिसूचना जारी करत, मोटार वाहन नियम 1989 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
या नियमानुसार, दुचाकी वाहन उत्पादकांनी नवीन दुचाकी विक्री करताना ग्राहकाला दोन प्रमाणित हेल्मेट द्यावी लागतील. यामुळे चालकासोबत मागील प्रवाशालाही हेल्मेट घालणे अनिवार्य होणार आहे. ही अधिसूचना अंतिम होताच, त्यानंतर तीन महिन्यांत हा नियम देशभर लागू केला जाण्याची शक्यता आहे. सध्या मंत्रालयाने या प्रस्तावावर नागरिकांची मते व हरकती मागवलेल्या असून, त्या 30 दिवसांच्या कालावधीत ईमेलद्वारे सादर करता येणार आहेत. (ईमेल: comments-morth@gov.in)
2026 पासून L2 प्रकारातील (50 सीसी पेक्षा अधिक क्षमतेचे किंवा 50 किमी/तासापेक्षा अधिक वेग असलेली) दुचाकींमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) बसवणे देखील अनिवार्य करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे अचानक ब्रेक लागल्यावर होणारे अपघात टळण्यास मदत होईल. दरवर्षी देशात होणाऱ्या लाखो दुचाकी अपघातांमध्ये हेल्मेट न वापरण्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. या पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. हा नवा नियम केवळ कायदेशीर बंधन नसून, वाहनचालक आणि प्रवाशाच्या जीवित सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.