Baramati Crime : बारामतीत एसटीत एकावर हल्ला बळी मात्र दुसऱ्याचा, नेमकं प्रकरण काय?
ST Bus Attack In Baramati : बारामतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वालचंदनगर बसमध्ये प्रवास करत असताना अचानक माथेफिरू तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार सुरु केले. दरम्यान घाबरलेले प्रवासी बसमधून जीवाच्या भीतीने पळू लागले. यामध्ये वाणेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकाचा समावेश आहे. प्रा रामचंद्र भोसले यांच्या पत्नी सौ. वर्षा भोसले या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत असताना अचानक जमिनीवर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर बारामतीतील अहिल्यादेवी होळकर मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरु होते. दरम्यान पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गेली पाच दिवसांपासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या सौ वर्षा भोसले यांचा आज दुपारी दुर्दैवी मृत्यू झाला. हकनाक बळी गेलेल्या सौ वर्षा भोसले यांचा हा दुर्दैवी मृत्यू बारामतीकरांना हेलावणारा आहे.
सुरक्षिततेच्या प्रवासाची हमी दक्ष असलेल्या चालकांमुळे एस टी महामंडळ देते;मात्र अशाप्रकारे हकनाक बळी एखाद्या प्रवाशाचा जात असेल, तर ती जबाबदारी कोणाची?, तिकीट काढल्यानंतर अपघाताचा विमा महामंडळ काढते, मात्र अशा घटनेमध्ये महामंडळ अथवा राज्य सरकारने हात झटकू नये, या घटनेत निष्पाप असलेल्या विवाहिता सौ वर्षा भोसले यांच्या दुर्दैवी मृत्यूची जबाबदारी कोण घेणार?, यासाठी सर्वच दक्ष नागरिकांनी आवाज उठवायला हवा.अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.