Nanded News : चालत्या एक्सप्रेसमधून मारली उडी अन् तब्बल 4 किमीपर्यंत इंजिनमध्ये लटकत होता तरुणाचा मृतदेह; रेल्वे थांबल्यानंतर...
नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. नंदिग्राम एक्सप्रेससमोर धावत्या अवस्थेत एका तरुणाने उडी घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली असून, मृतदेह थेट एक्सप्रेसच्या इंजिनाला लटकत सुमारे चार किलोमीटरपर्यंत गाडीबरोबर पुढे गेला. ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीवरून समजते की, गणेश पांडुरंग लोलेपवाड (वय 20) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने नंदिग्राम एक्सप्रेस समोर धावत्या वेळी उडी मारली. हे कृत्य इतक्या अचानक झाले की, गाडीचा वेग पाहता रेल्वे प्रशासनाला काही समजण्याआधीच त्याचा मृतदेह इंजिनाच्या काही भागाला अडकून गाडीबरोबर पुढे जात राहिला. ही भयावह बाब हिमायतनगर स्थानकावर गाडी थांबल्यानंतर लक्षात आली. तेव्हा इंजिनाच्या भागाला काहीतरी अडकलं आहे याची शंका आल्याने तपासणी केली असता मृतदेह लटकलेला दिसून आला. त्यामुळे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली.
गाडीने सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर पार केल्यानंतर ही बाब उघडकीस आली, त्यामुळं रेल्वे प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तात्काळ पोलिस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे. मृत तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.