Nanded : पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला म्हशीचा चावा अन् मृत्यूपूर्वीच तिच्या दूधाची गावभर विक्री, 182 जणांना रेबीजची..
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बिल्लाळी गावात "रोग म्हशीला आणि औषध पखालीला" ही जुन्या पिढ्यांची म्हण खरी ठरली. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने एक म्हैस दगावली, पण मृत्यूपूर्वी तिचं दूध गावातील अनेक घरांमध्ये, चहाच्या कपात आणि पदार्थांमध्ये पोहोचलं. परिणामी, तब्बल 182 गावकऱ्यांना रेबीज प्रतिबंधक लस घ्यावी लागली.
घटनेनुसार, किशन दशरथ इंगळे यांच्या म्हशीला काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला होता. सुरुवातीला गंभीरतेची कल्पना न आल्याने उपचार झाले नाहीत. काही दिवसांनी म्हैस आजारी पडली आणि 5 ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला. त्याआधीच तिचं दूध गावात विविध घरांमध्ये वितरित झालं होतं. तपासात 180 हून अधिक लोकांनी हे दूध पिल्याचं निष्पन्न झालं.
आरोग्य विभागाने तातडीने पथक पाठवून बिल्लाळी, येवती, राजुरा, बाराळी आणि देगलूर येथील मिळून 182 लोकांना लस दिली. डॉक्टर प्रणिता गव्हाणे यांनी सांगितले की, “म्हशीला रेबीज झाला असेल, ही भीती लोकांमध्ये होती. त्यामुळे त्यांनी खबरदारी म्हणून लस घेतली.”
रेबीज हा अत्यंत घातक आजार असून वेळेत उपचार न झाल्यास मृत्यू निश्चित मानला जातो. भारतात दरवर्षी लाखो लोकांना प्राणी चावतात आणि अंदाजे 20 हजार लोक या आजाराला बळी पडतात. कुत्र्यांच्या चावण्यामुळे होणाऱ्या केसेसचा यात सर्वाधिक वाटा आहे. या घटनेनंतर बिल्लाळी गावात खळबळ माजली आहे.