Pune Rain : पुण्यात अनोखं आंदोलन! पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात होडी चालवून व्यक्त केला निषेध
पुण्यात काल झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले. अनेक भागांमध्ये पावसाचं पाणी रस्त्यांवर साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे कार्यकर्ते गजेंद्र बाबा मोरे यांनी मांजरी परिसरात साचलेल्या पाण्यात होडी चालवून अनोखं आंदोलन केलं. या माध्यमातून त्यांनी महापालिका आणि पीएमआरडीएच्या कामकाजावर जोरदार निशाणा साधला. रस्त्यांवर नद्या वाहाव्यात इतकी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
या अनोख्या आंदोलनाची सध्या पुण्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे. नागरिकांकडून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे, तर अनेकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर संतापही व्यक्त केला आहे.
दरम्यान, पुण्यात याआधीही अशा स्वरूपाची आंदोलने अनेक वेळा पाहायला मिळाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे, वाहने अर्धवट पाण्यात अडकणे, तर काही भागांमध्ये घरातच पाणी घुसण्याचे प्रकार घडतात. या वारंवार होणाऱ्या समस्यांमुळे पुणेकर त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका होत आहे. नागरिकांना दरवर्षी हीच परिस्थिती का सहन करावी लागते, असा संतप्त सवाल पुणेकर आता विचारत आहेत.