Pune Firing : पुण्यातील हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीचा प्रकार जीवावर बेतला

Pune Firing : पुण्यातील हडपसरमध्ये गोळीबार, मस्तीचा प्रकार जीवावर बेतला

पुण्यात शिंदे गटाशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या मुलाने मस्तीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडली. मात्र ही गोळी चुकून त्याच्या मावस भावाला लागली.
Published by :
Prachi Nate
Published on

पुणे शहरातील हडपसर परिसरात बुधवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. शिंदे गटाशी संबंधित एका कार्यकर्त्याच्या मुलाने मस्तीमध्ये गावठी कट्ट्यातून हवेत गोळी झाडली. मात्र ही गोळी चुकून त्याच्यासोबत असणाऱ्या मावस भावाच्या खांद्याला लागली. गोळीबाराची ही घटना कॅनल रोड, सातववाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सव्वा आठच्या सुमारास घडली.

गोळी लागलेल्या तरुणाचे नाव वैभव श्रावण गवळी वय 20 असून तो केशवनगर, मुंढवा येथे राहतो आणि डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो त्याचा मावस भाऊ सुमित खवळे व इतर मित्रांसोबत दुचाकीवरून एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जात असताना ही घटना घडली. सुमित खवळे याच्याजवळ अवैध गावठी कट्टा होता. मस्तीच्या नादात त्याने हवेत गोळी झाडली, पण ती थेट वैभवच्या खांद्यात घुसली. जखमी वैभवला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र परिस्थिती लक्षात घेता त्याला ससून रुग्णालयात हलवण्यात आले.

ससून रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर मुंढवा पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सध्या सुमित खवळेवर गैरकृत्य केल्याचा गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे. याआधीही अशाच प्रकारच्या घटनांमध्ये शिंदे गटाशी संबंधित व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. नीलेश घारे या युवकाने स्वतःवर गोळीबाराचा बनाव केला होता. मात्र पोलिस तपासात उघड झालं की गोळीबार त्याच्या ओळखीच्या तरुणांनीच केला होता. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, राजकीय कार्यकर्त्यांचे मुले अशा प्रकारे कायदा हातात घेत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com