Weather Update : राज्यातील काही भागात आज ढगाळ वातावरण, हवामानाचा लहरीपणा वाढला
राज्यात आणि देशभरात हवामानात सातत्याने बदल होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, तापमानातील चढउतार, अवकाळी पाऊस आणि वाढते वायू प्रदूषण यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमानात मोठ्या प्रमाणात चढउतार होण्याची शक्यता असून, काही भागांत थंडी कायम राहणार आहे, तर काही ठिकाणी उष्णतेचा अनुभव येणार आहे.
देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये अद्यापही कडाक्याची थंडी जाणवत आहे. मात्र महाराष्ट्रात काही दिवसांपासून तापमानात वाढ होताना दिसत आहे. थंडी कमी झाली असली तरी वायू प्रदूषण मात्र कमी होण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, खोकला, दम्याचे त्रास वाढत असून, डॉक्टरांकडून नागरिकांना मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे.
जानेवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू असतानाही देशातील काही भागांत पावसाची हजेरी लागली आहे. हवामान विभागाने काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. महाराष्ट्रातही वर्षाच्या सुरुवातीलाच वाऱ्यासह जोरदार पावसाचा अनुभव नागरिकांनी घेतला. त्यानंतरपासून राज्यातील अनेक भागांत तापमानात चढउतार दिसून येत आहेत. उत्तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
दरम्यान, पुणे शहरात हवामानाचा विचित्र खेळ पाहायला मिळाला आहे. अवघ्या दहा किलोमीटरच्या अंतरात किमान तापमानात तब्बल सहा अंश सेल्सिअसपर्यंत तफावत आढळून आली आहे. वाढते शहरीकरण, सिमेंटचे जंगल, सुरू असलेली विकासकामे आणि काही भागांत अजूनही टिकून असलेली हिरवाई याचा थेट परिणाम शहरातील स्थानिक हवामानावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गेल्या काही दिवसांत शहराच्या काही भागांत किमान तापमान 9 ते 10 अंश सेल्सिअस इतके कमी होते, तर काही भागांत ते 15 अंशांच्या पुढे नोंदवले गेले.
देशातील नीचांकी तापमानाची नोंद पंजाबमधील भटिंडा येथे झाली असून, तेथे तापमान 0.6 अंश सेल्सिअस इतके होते. महाराष्ट्रात धुळे येथे राज्यातील नीचांकी तापमान 6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. निफाड येथे 7.7 अंश, तर भंडारा, गोंदिया आणि मालेगाव येथे 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, हलका ते मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही अनेक ठिकाणी हलका ते जोरदार पाऊस अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
