Mumbai Local Accident : अतिशय दुर्दैवी घटना! ; उच्चस्तरीय चौकशी सुरू, जखमींवर मोफत उपचार
मुंबईतील मुंब्रा स्थानकाच्या अलीकडे दोन लोकल गाड्यांमध्ये झालेल्या अपघाताबाबत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली असून, ही घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून, एकूण 10 जखमींवर उपचार सुरू आहेत. सरकारकडून मृतांच्या नातेवाइकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले, "मुंब्रा स्टेशनजवळ एका टर्निंगवर दोन लोकल समोरासमोर आल्या आणि एकमेकांजवळ आल्यामुळे काही प्रवासी गाडीच्या बाहेर लटकलेले होते. त्यामुळे घर्षण होऊन चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि इतर जखमी झाले."
जखमींवर मोफत उपचार
महाजन यांनी सांगितले की, "जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन गंभीर जखमींवर जुपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, त्यांचे सिटी स्कॅन आणि एमआरआय झाले आहेत. आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाईल. सर्व उपचाराचा खर्च शासन उचलेल."
मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
या दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत तर जखमींना त्यांच्या जखमेच्या गंभीरतेनुसार ५० हजार ते २ लाखांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री सतत संपर्कात
मुख्यमंत्री फडणवीसांनी तात्काळ घटनास्थळी चौकशीचे आदेश दिले असून, रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. महाजन म्हणाले, "मुख्यमंत्री महोदयांनी मला फोन करून घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. मी प्रवासात होतो, त्यामुळे उशीर झाला. मात्र मुख्यमंत्री सातत्याने परिस्थितीवर नजर ठेवून आहेत."
रेल्वेच्या वेळापत्रकावर सवाल
मध्य रेल्वे नेहमीच उशिराने धावत असल्याने प्रवासी गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी होते. अपघाताची शक्यता वाढते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करणं गरजेचं आहे," असे अनेकांकडून सवाल केले जात आहे.
सध्या या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून, रेल्वेच्या वरिष्ठ तांत्रिक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. राज्य सरकारने ही घटना गंभीरपणे घेतली असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जाईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.