नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला मुंबई भाजप अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलारांचा भक्कम पाठिंबा!

नाट्यपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला मुंबई भाजप अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलारांचा भक्कम पाठिंबा!

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली.
Published by :
Siddhi Naringrekar

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेची नियामक मंडळाची निवडणुक नुकतीच पार पडली. आता येत्या १६ मे ला नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक आणि इतर पदांसाठी निवडणुक होणार आहे. नाट्यपरिषदेवर महाराष्ट्रभरातून निवडून आलेले ६० सदस्य अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करणार आहेत. या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या नेतृत्वाखाली आपलं पॅनल मैदानात आहेत तर दुसरीकडे प्रशांत दामलेंच्या नेतृत्वाखाली पॅनल मैदानात आहे. प्रसाद कांबळी विरूध्द प्रशांत दामले यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे.

मात्र जसजशी निवडणुक जवळ आली आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीतही राजकारण रंगू लागलं आहे. प्रशांत दामलेंनी अध्यक्षपद सोडून इतर पदांवर उभे केलेले उमेदवार हे इतर पक्षाशी नाळ असणारी मंडळी आहेत. प्रशांत दामलेंच्या पॅनलला सध्याच्या मंत्रीमंडळातील मंत्री उदय सामंत यांचा वरदहस्त असून नाट्यपरिषदेच्या निवडणुकीसाठी गेले वर्षभर ते प्रयत्न करत आहेत. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या पॅनलसाठी उदय सामंत हे स्वतः राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बरोबर घेत चांगलंच पाठबळ निर्माण केलं व आपले सदस्य निवडून आणण्यासाठी उदय सामंत यांनी जंग जंग पछाडलं होतं. त्यामुळे या निवडणुकीला एक राजकीय रंग निर्माण झाला. रंगभूमीचा विकास सोडून नाट्यपरिषदेत राजकारण आणायचा या पॅनलचा मनोदय आहे.

तर दुसरीकडे प्रसाद कांबळी ह्यांचे आपलं पॅनल आहे ज्या पॅनेल मध्ये रंगभूमीवर कार्यरत असलेले नाट्यकर्मी, बॅकस्टेज आर्टिस्ट आणि रंगभूमीशी जवळीक असणारी माणसे आहेत . ज्यांना खरंच रंगभूमीसाठी योगदान द्यायचं आहे. नाट्यपरिषदेच्या निवडणुकीत होत असलेल्या या राजकारणाविषयी मुंबई भाजपचे अध्यक्ष व वरिष्ठ नेते आशिष शेलार यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने प्रसाद कांबळींना बोलवून या संपूर्ण निवडणूकीविषयी आणि होणाऱ्या चुकीच्या गोष्टींविषयी माहिती घेतली. आणि सरतेशेवटी 16 मेला होणाऱ्या नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलला आपला पाठिंबा जाहिर केला. मराठी रंगभूमी हा आपला एक सांस्कृतिक ठेवा आहे. आणि रंगभूमी आणि रंगकर्मींचा विकास होण्यासाठी राजकारणविरहीत वातावरण आणि चांगल्या माणसांची आवश्यकता असल्याने मी प्रसाद कांबळींना मराठी रंगभूमीचा एक चाहता म्हणून आपला पाठिंबा दर्शवतो आहे. भाजप हा पक्ष नेहमीच प्रत्येक गोष्टीत चांगल्या माणसांच्या पाठी नेहमीच भक्कम उभा राहतो त्यामुळे आपण प्रसाद कांबळी आणि त्याच्या पॅनलला साथ देत आहोत अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केली. प्रसाद कांबळींच्या मागे आशिष शेलार यांची साथ मिळाल्याने प्रसाद कांबळींचं आपलं पॅनलचं पारडं अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भक्कम झाले आहे .

या निवडणुकीत आपलं पॅनलतर्फे प्रसाद कांबळी, अविनाश नारकर, जगन्नाथ (नाथा) चितळे, अजय दासरी, सुकन्या कुलकर्णी - मोने, ऐश्वर्या नारकर, गीतांजली ठाकरे, गीताबाली उनवणे आदी रंगकर्मी या निवडणुकीत निवडणूक लढवीत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com