Kolhapur Municipal Election : कोल्हापूर पालिकेत ‘नोटा’ वजा मते ठरली निर्णायक; १२९ जणांची अनामत जप्त

Kolhapur Municipal Election : कोल्हापूर पालिकेत ‘नोटा’ वजा मते ठरली निर्णायक; १२९ जणांची अनामत जप्त

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली असून, अपेक्षित मतदान न मिळाल्याने तब्बल १२९ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर एक महत्त्वाची बाब समोर आली असून, अपेक्षित मतदान न मिळाल्याने तब्बल १२९ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. महापालिकेच्या ८१ जागांसाठी एकूण ३२७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. मात्र, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आवश्यक किमान मते न मिळाल्याने अनेक उमेदवारांना आर्थिक फटका बसला आहे.

नियमानुसार, संबंधित प्रभागात पडलेल्या एकूण मतांपैकी (नोटा वगळून) किमान एक षष्टांश मते मिळाल्यासच उमेदवाराची अनामत परत मिळते. या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अडीच हजार रुपये अनामत भरावी लागली होती. मात्र अपेक्षित मते न मिळाल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक फटका बसला आहे. विविध प्रभागांतून ७६ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली होती, त्यापैकी तब्बल ६० अपक्ष उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. केवळ १६ अपक्ष उमेदवारांनी आवश्यक मते मिळवत आपली अनामत वाचवली आहे.

राजकीय पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांना मोठा धक्का बसला असून, त्यांच्या १७ पैकी १५ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे. आम आदमी पक्षाचे १४ उमेदवार रिंगणात होते, त्यापैकी ११ जणांना अपेक्षित मते मिळू शकली नाहीत. तसेच, यापूर्वी महापालिकेच्या राजकारणात सत्तेत असलेल्या, मात्र यावेळी अचानक मैदानात उतरलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षालाही मोठा फटका बसला असून, त्यांच्या २६ पैकी १४ उमेदवारांची अनामत जप्त झाली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे ८, लोकराज्य जनता पार्टीचे ५, हिंदू महासभेचे ४ आणि शेकापचे २ उमेदवारही या यादीत आहेत. बहुजन रिपब्लिकन पार्टी, प्रहार, ओबीसी बहुजन आघाडी, एमआयएम आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रत्येकी एक उमेदवार अपेक्षित मते न मिळाल्याने अनामत गमावून बसला आहे. शिवसेना (ठाकरे गट) च्या एका उमेदवाराचाही यात समावेश आहे.

दरम्यान, ३२७ पैकी ८१ उमेदवार विजयी ठरल्याने त्यांची अनामत आपोआप वाचली, तर पराभूत होऊनही ११९ उमेदवारांनी आवश्यक मते मिळवत आपली अनामत सुरक्षित ठेवली आहे. या आकडेवारीवरून कोल्हापूर महापालिका निवडणुकीत मतदारांचा कौल अत्यंत स्पष्ट आणि कठोर असल्याचे दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com