Sanjay Raut : मुंबई महापौरपदाच्या लढतीत ‘देवाची इच्छा’ की राजकीय डावपेच? राऊतांच्या विधानाने वाढली उत्सुकता

Sanjay Raut : मुंबई महापौरपदाच्या लढतीत ‘देवाची इच्छा’ की राजकीय डावपेच? राऊतांच्या विधानाने वाढली उत्सुकता

मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना, राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असताना, राजकीय वातावरण आणखी तापू लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी “देवाची इच्छा असेल तर मुंबईत आपलाच महापौर बसेल” असं विधान केल्यानंतर, या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत “मुंबईचा महापौर महायुतीचाच व्हावा, हीच देवाची इच्छा आहे” असं म्हणत राजकीय आघाडीची भूमिका ठामपणे मांडली होती.

या पार्श्वभूमीवर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या सूचक विधानामुळे महापौरपदाच्या लढतीत नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “बहुमत हे चंचल असतं. देवाची इच्छा असेल तर शिवसेनेचा महापौर बसू शकतो. आम्ही सध्या तटस्थपणे घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत,” असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊतांच्या या वक्तव्यामुळे मुंबईतील सत्तासमीकरणांबाबत नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. संख्याबळाच्या गणितात महायुती आघाडीवर असली, तरी महापालिकेतील राजकारण हे नेहमीच अनपेक्षित वळण घेणारं राहिलं आहे. अपक्ष नगरसेवक, नाराज गट आणि अंतर्गत अस्वस्थता या सगळ्या घटकांमुळे महापौरपदाचा निकाल शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्ट होणार नाही, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

शिवसेना ठाकरे गट सध्या प्रत्यक्ष संख्याबळात पिछाडीवर असला, तरी “वेट अँड वॉच”ची भूमिका घेतल्याने ते योग्य संधीची वाट पाहत असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे, महायुतीकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली वेगात सुरू असून बहुमत टिकवून ठेवण्यावर भर दिला जात आहे.

एकीकडे “देवाची इच्छा” हा मुद्दा चर्चेत असताना, दुसरीकडे वास्तवात मात्र राजकीय डावपेच, संख्याबळ आणि सौदेबाजी यांचाच खेळ सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीत अखेर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. सध्या तरी एकच प्रश्न चर्चेत आहे — मुंबईत महापौरपदाच्या निवडणुकीत खरंच ‘कहानी मे ट्विस्ट’ येणार का?

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com