Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळाला. मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना विसर्जन मिरवणुकीत घडल्या. विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांनी 300 नागरिकांचे मोबाइल चोरल्याची माहिती मिळत आहे.
याप्रकरणी मध्यभागातील फरासखाना, विश्रामबाग, खडक वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्वाधिक मोबाइल चोरीच्या घटना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती मिळत आहे.
फरासखाना पोलिसांनी मध्यप्रदेश आणि नाशिक येथील मोबाईल चोरांच्या टोळीतील दोघांना पकडून दोन लाख 79 हजाराचे 21 मोबाइल जप्त केले असून मुख्य मिरवणूक मार्गावर चोरट्यांनी 91 मोबाइल चोरले आहेत.
यासोबतच बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकात मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्याची माहिती मिळत असून विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी मोठी गर्दी झाली होती.