शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा; लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार

लोकसभेच्या निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन १९ एप्रिलपासून देशात सात टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडेल, अशी माहिती दिली. महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत मतदान होणार असून राज्यासाठी ही निवडणूत अत्यंत अटीतटीची राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आता तयारीला लागले आहेत.
Published by :
shweta walge

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत मोठ्या उत्साहात दाखल झाली. चैत्यभूमीवर या यात्रेची सांगता झाल्यानंतर मुंबईतील शिवाजी पार्कवर आज (ता. १७) इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. या सभेत ‘इंडिया’ आघाडीच्या प्रचाराचे रणशिंग या माध्यमातून फुंकण्यात येईल. या सभेआधी राहुल गांधी यांची मुंबईत 'न्याय संकल्प' पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही 'न्याय संकल्प' पदयात्रा असणार आहे.

इंडिया आघाडीच्या या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन (माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी) आपचे नेते सौरभ भारद्वाज, दिपांकर भट्टाचार्य यांच्यासह इंडियाचे १५ हून अधिक मित्र पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यावर इंडिया आघाडीची पहिली सभा मुंबईत होत आहे.

या सभेपूर्वी राहुल गांधी यांची मुंबईत न्याय संकल्प पदयात्रा होणार आहे. मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान ही पदयात्रा असणार आहे. सकाळी साडेआठ वाजता मुंबईच्या मार्गावर राहुल गांधी यांची पदयात्रा सुरु होणार आहे. या पदयात्रेत सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पदयात्रेनंतर तेजपाल सभागृहात सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांशी राहुल गांधी चर्चा करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com