Hardeep Singh Nijjar याच्या हत्येमागे भारताचा सहभाग नाही, कॅनडाच्या अहवालातून निष्कर्ष
थोडक्यात
खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग नाही
माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा आरोप चुकीचा असल्याचा अहवाल
कॅनडा आयोगाच्या अहवालातून उघडकीस
कॅनडामध्ये मोठ्या राजकीय घडमोडी सुरू असताना भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जस्टिन ट्रूडो कॅनडाच्या पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. त्यानंतर आता कॅनडा आयोगातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग नसल्याचा निष्कर्ष या अहवालातून काढण्यात आला आहे. माजी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हा आरोप केला होता. मात्र, हा आरोप चुकीचा असल्याचा अहवाल देत निज्जरच्या हत्येमध्ये परकीय राज्याशी कोणताही निश्चित संबंध नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
खलिस्तानी फुटीरतावादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमागे भारत असल्याचा दावा सप्टेंबर २०२३ मध्ये ट्रूडो यांनी केला होता. कॅनडाकडे भारताविरोधात विश्वासार्ह पुरावे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामध्ये निज्जरची १८ जून, २०२३ रोजी हत्या करण्यात आली. यामध्ये भारतीय एजंट सामील होते, तसे पुरावे असल्याचा दावा कॅनडाने केला होता.
भारतीय किंवा परदेशी संबंध नाही- अहवाल
यासंदर्भात मंगळवारी १२३ पानी अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. ‘Public Inquiry Into Foreign Interference in Federal Electoral Processes and Democratic Institutions’ या शीर्षकाखाली अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हरदीपसिंग निज्जरच्या हत्येशी भारताविषयी चुकीची माहिती पसरवली. या हत्येशी हत्येशी कोणताही परदेशी संबंध स्पष्ट झाला नसल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारत आणि कॅनडा संबंध ताणले होते
माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडले होते. ट्रुडो यांच्या आरोपांना केंद्र सरकारकडून वेळोवेळी उत्तर देण्यात आलं होतं. ट्रुडो सरकारच्या कॅनडात राहणाऱ्या खलिस्तानी चळवळीच्या समर्थक धार्जिण्या धोरणावर भारताने वारंवार टीका केली होती. खलिस्तान चळवळीवर भारतात बंदी आहे. मात्र, कॅनडात राहणाऱ्या शिखांचा त्याला पाठिंबा आहे. या संपूर्ण प्रकरणानंतर कॅनडातील भारतीय मुत्सद्दींची हकालपट्टी करण्यात आली होती, याचाही उल्लेख १२३ पानांच्या अहवालात करण्यात आला आहे. त्याचे प्रत्युत्तर देत भारतानेही कॅनडाच्या सहा मुत्सद्यांची हकालपट्टी करून आपल्या उच्चायुक्तांना मायदेशी बोलावलं होतं.
कोण होता हरदीप सिंग निज्जर?
हरदीप सिंग निज्जर हा खलिस्तानी फुटीरतावादी होता. १९९७ साली तो पंजाबहून कॅनडामध्ये स्थलांतरित झाला. पश्चिम कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रोव्हिएन्समधील सरे या शहरात तो राहत होता. सुरुवातीला कॅनडामध्ये तो प्लम्बरचे काम करायचा. त्यानंतर लग्न करून तो कॅनडातच स्थायिक झाला. त्याला दोन मुलं आहेत. २०२० सालापासून तो सरे शहरातील गुरुद्वाराचा प्रमुख होता.
दरम्यान, या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेल्या ४ भारतीयांचा जामीन कॅनडातील न्यायालयाने मंजूर केला आहे. अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार या चौघांचा जामीन मंजूर केला आहे. त्यांच्यावर फर्स्ट डिग्री खून आणि हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता.