Dalai Lama : दलाई लामांच्या उत्तराधिकारीविषयी भारताचा ठाम निर्णय, चीनच्या हस्तक्षेपाला विरोध
चीनने दलाई लामांच्या उत्तराधिकारीविषयी हस्तक्षेप करण्याची भूमिका घेतल्यानंतर भारताने स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी सांगितले की, दलाई लामांच्या फेरनिवडीचा निर्णय केवळ ते स्वतः आणि गदेन फोडरंग ट्रस्टच घेऊ शकतो. या संदर्भात कोणत्याही बाह्य शक्तीला, विशेषतः चीनला, हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
रिजिजू म्हणाले, “दलाई लामा हे बौद्ध समाजासाठी अत्यंत पूज्य आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्याशी संबंधित परंपरा आणि परंपरागत नियमांनुसारच त्यांच्या उत्तराधिकारीची निवड होईल.”
भारत सरकारने हे मत अशा वेळी मांडले आहे, जेव्हा चीनने दलाई लामांच्या उत्तराधिकारीची अंतिम घोषणा त्यांच्या सरकारमार्फत होईल, अशी मागणी केली होती. चीनचा दावा आहे की, पुढचा दलाई लामा त्यांच्याच पद्धतीने – ‘गोल्डन अर्न’ लॉटरीद्वारे आणि सरकारी मान्यतेनंतरच निवडला जाईल.
दलाई लामांनी अलीकडेच सांगितले की, त्यांना देश-विदेशातून, विशेषतः तिबेटमधील लोकांकडून, वारंवार विनंत्या येत आहेत की त्यांनी ही परंपरा सुरू ठेवावी. त्यांनी हेही स्पष्ट केलं की, गदेन फोडरंग ट्रस्टच त्यांच्या पुढच्या उत्तराधिकारीची निवड करेल. ६ जुलैला धर्मशाळा येथे होणाऱ्या त्यांच्या ९०व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात भारत सरकारकडून किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह सहभागी होणार आहेत.