Asia Cup : भारत सरकारची पाकिस्तानच्या हॉकी संघाला आशिया चषकासाठी परवानगी
पुढील महिन्यात बिहारमधील राजगीर येथे होणाऱ्या आशिया चषक हॉकी स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या हॉकी संघाला भारतात येण्याची परवानगी देण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयातील सूत्रांनी ही माहिती दिली असून, गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि क्रीडा मंत्रालयाकडून अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्वैपक्षीय क्रीडा संबंध सध्या थांबलेले असले, तरी बहुराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागाबाबत भारत सरकारने मोकळा दृष्टिकोन ठेवला आहे. 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 या कालावधीत राजगीर येथे आशिया चषक होणार आहे, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चेन्नई आणि मदुरई येथे हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, ऑलिंपिक चार्टरनुसार कोणत्याही देशाच्या सहभागावर बंदी घालणे योग्य नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या सहभागास विरोध करण्यात आले नाही. मात्र, द्वैपक्षीय मालिका किंवा सामने याबाबत सरकारची भूमिका तीव्रच राहणार आहे.
हॉकी इंडिया संघटनेने केंद्राच्या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, सरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्यानुसार कार्य करतो. दरम्यान, क्रिकेट आशिया चषकातही भारत-पाकिस्तान एकाच गटात आहेत. मात्र त्याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक विनंती बीसीसीआयकडून मंत्रालयाकडे आलेली नाही. त्यावर निर्णय नंतर घेतला जाईल, असं मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलं.