भारतीय नौदलाला मिळाले नवे बोधचिन्ह; छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे खास नाते

भारतीय नौदलाला मिळाले नवे बोधचिन्ह; छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे खास नाते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाचे अनावरण केले

कोची : देशातील सर्वात मोठे आणि पहिले स्वदेशी विमानवाहू 'INS विक्रांत' आज भारतीय नौदलाच्या सेवेत ताफ्यात झाली. यावेळी भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाचेही अनावरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हाचे अनावरण केले. नव्या चिन्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी आहे.

नवा नौदलाचे चिन्ह भारताने वसाहतवादी भूतकाळ सोडला आहे हे सांगणारी आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ही खूण होती, असे पंतप्रधान मोदी यांनी अनावरणावेळी म्हंटले आहे. आतापर्यंत नौदलाचे प्रतीक पांढरा ध्वज होता, ज्यावर उभ्या आणि आडव्या लाल पट्टे होते. त्याला क्रॉस ऑफ सेंट जॉर्ज म्हणतात. त्याच्या मध्यभागी अशोक चिन्ह बनवले होते. डावीकडे वरती तिरंगा होता.

नवीन चिन्हातून रेड क्रॉस काढून टाकण्यात आला आहे. वरच्या डाव्या बाजूला तिरंगा आहे. त्याच वेळी, निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात जहाजी नांगर दाखविण्यात आले असून त्यावर अशोक चिन्ह आहे. हे सर्व एका अष्टकोनी ढालीत कोरण्यात आलं आहे. त्यावरील ही ढाल छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्राप्रमाणे आहे. मात्र या ढालीचा आकार अष्टकोनी असण्यामागचं कारण विशेष आहे. या अष्टकोनाच्या आठ बाजू भारतीय नौदलाच्या सर्व दिशेत पोहोचण्याची आणि कारवाई करण्याची क्षमता दाखवतात, असं यावेळी सांगण्यात आलं. नवीन चिन्हाच्या खाली संस्कृत भाषेत 'शं नो वरुणः' लिहिले आहे. याचा अर्थ 'पावसाची देवता आमचे रक्षण करो'.

शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे जनक आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. स्वराज्याला समुद्रावाटे होणाऱ्या परकीय हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी त्यांनी सर्वांत पहिली योजना आखून स्वतःचं नौदल उभारलं होतं, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी शिवाजी महाराजांना कार्यक्रमात मानवंदना अर्पण केली.

काय आहे भारतीय नौदलाच्या चिन्हाचा इतिहास?

स्वातंत्र्यानंतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा नौदलाचीही विभागणी करण्यात आली होती. रॉयल इंडियन नेव्ही आणि रॉयल पाकिस्तान नेव्ही अशी त्यांची नावे होती. 26 जानेवारी 1950 रोजी भारत प्रजासत्ताक बनला तेव्हा त्यातून 'रॉयल' हा शब्द काढून नाव इंडियन नेव्ही ठेवण्यात आले.

नाव बदलले, पण नौदल चिन्हामध्ये ब्रिटीश काळाची झलक कायम होती. नौदलाच्या ध्वजावर दिसणारा लाल क्रॉस म्हणजे 'सेंट जॉर्ज क्रॉस', जो इंग्रजी ध्वज, युनियन जॅकचा भाग होता. हा लाल क्रॉस नौदलाच्या चिन्हावर राहिला आणि त्याच्या वरच्या डाव्या बाजूला तिरंगा ठेवण्यात आला. 2001 मध्ये हा ध्वज बदलण्यात आला आणि रेड क्रॉस काढून टाकण्यात आला. त्याऐवजी अशोकाचे प्रतीक निळ्या रंगात बनवले होते. मात्र, निळा रंग समुद्र आणि आकाशात मिसळत असल्याने तो दिसत नसल्याची तक्रार होती. त्यानंतर 2004 मध्ये त्यात पुन्हा बदल करून रेड क्रॉस बसवण्यात आला. पण यावेळी अशोक चिन्ह लाल क्रॉसच्या मध्यभागी ठेवण्यात आले होते. 2014 मध्ये, त्यात पुन्हा बदल करण्यात आला आणि अशोक चिन्हाच्या खाली 'सत्यमेव जयते' असे लिहिण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com