Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप
अमेरिकेतील इलिनॉय राज्यात टार्गेट या नामांकित रिटेल स्टोअरमध्ये भारतीय महिलेने जवळपास $1,300 (सुमारे 1.11 लाख रुपये) किमतीची वस्त्रे आणि अन्य वस्तू चोरल्याचा आरोप झाल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटनेचा बॉडीकॅम व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यावरून अमेरिकन पोलिस आणि कर्मचाऱ्यांमध्ये झालेली चर्चा चांगलीच गाजतेय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला सात तासांहून अधिक वेळ स्टोअरमध्ये फिरत होती. स्टोअरमधील कर्मचाऱ्यांनी तिच्या संशयास्पद वागणुकीकडे लक्ष दिल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलेची चौकशी सुरू केली. या दरम्यान, महिलेला स्टोअरच्या पश्चिम गेटमार्गे कोणतेही पैसे न देता वस्तूंसह बाहेर जाताना अडवण्यात आले.
"ती महिला ७ तासांपासून दुकानात फिरत होती. ती विविध वस्तू उचलत होती, मोबाईलमध्ये काही तरी पाहत होती, आणि शेवटी ती बिल न करता बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होती," असं एका स्टाफ सदस्याने पोलिसांना सांगितल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येतं. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून तिच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीदरम्यान महिलेनं सांगितलं की, ती त्या वस्तूंसाठी पैसे देण्यास तयार होती. मात्र, चौकशी अधिकारी तिला विचारतात "भारतात चोरी करायला परवानगी आहे का? मला तसं वाटत नाही." — हा प्रश्न सोशल मीडियावर विशेष गाजतो आहे आणि त्यावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, संबंधित महिलेला भारतीयांचे नाव खराब केल्याबद्दल टीकेचं धनी ठरवलं आहे. तर काहींनी अमेरिकन पोलिसाच्या वागणुकीवर आक्षेप घेत "सर्व भारतीय चोरी करतात" असा अर्थ निघेल अशा भाष्याचा निषेध नोंदवला आहे.