Valmik Thapar : 'Tiger Man' वाल्मीक थापर यांनी वयाच्या 73 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
भारताचे प्रख्यात वन्यजीव अभ्यासक आणि 'Tiger Man' म्हणून ओळखले जाणारे वाल्मीक थापर यांचे 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी सकाळी नवी दिल्लीत काउटिल्य मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्यावर आज दुपारी 3.30 वाजता लोदी इलेक्ट्रिक दाहिनीभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भारतातील वनसंवर्धन क्षेत्रातील एक बुलंद व्यक्तिमत्त्व असणारे थापर यांनी चार दशकांहून अधिककाळ वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित केला. त्यांनी त्यांच्या लेखन, सिनेसृजन आणि चळवळींमधून संरक्षण निती घडवण्यात मोलाचे योगदान दिले. 1988 मध्ये त्यांनी रणथंभोर फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची सह-स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक लोकांना सहभागी करून घेणाऱ्या संरक्षण नितीचा पुरस्कार केला. त्यांनी नेहमीच शिकार प्रतिबंधक कठोर कायदे आणि वाघांसाठी मानवी हस्तक्षेपापासून मुक्त क्षेत्र राखण्याची मागणी केली.
वाल्मीक थापर आपल्यामागे एक समृद्ध वारसा ठेवून गेले आहेत. भारतीय जंगलांप्रती असलेली प्रखर निष्ठा आणि त्या जंगलातील प्राण्यांसाठी असलेला निःस्वार्थ आवाज त्यांच्या कार्यात कायम जिवंत राहील.