Indigo Crisis : देशभर इंडिगोच्या फ्लाईट रद्द, एवढा गदारोळ कशामुळं झाला
एअरलाइन इंडिगोच्या बुधवार आणि गुरुवार मिळून देशातील सर्वात मोठी 450 हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्या आहेत. इंडिगोचा प्रवासी विमान वाहतुकीतील हिस्सा 65 टक्के आहे. यामुळं देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे.देशभरातील प्रत्येक विमानतळांवर प्रवाशांचा संताप पाहायला मिळत आहे. इंडिगोच्या 450 फ्लाईट रद्द झाल्यानं इतर विमान कंपन्यांसह इंडिगोनं देखील तिकिटाचे दर वाढवले आहेत. इंडिगोनं गेल्या चार दिवसांमध्ये 1000 हून अधिक फ्लाईट रद्द केल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. याचा फटका दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद या ठिकाणच्या प्रवाशांना बसला. अखेर या परिस्थितीवर डीजीसीएनं मार्ग काढण्यासाठी 1 नोव्हेंबरपासून लागू केलेलं एफडीटीएल नोटिफिकेशन लागू करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.
सॉफ्टवेअर अपडेशनमुळं पहिल्यांदा फ्लाईट रद्द
एअरबस A320 च्या सॉफ्टवेअरमध्ये आलेल्या ग्लिचमुळं पहिल्यांदा फ्लाईट रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ड्यूटी टाइम लिमिटेशन नियम लागू झाल्यानं मोठ्या संख्येनं पायलट आणि क्रू सुट्टीवर गेले. यामुळं इंडिगोच्या फ्लाईट रद्द कराव्या लागल्या.
इंडिगोच्या फ्लाईट रद्द होण्याची कारणं?
इंडिगोनं फ्लाईट रद्द कराव्या लागल्या त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगितली. त्यामध्ये सॉफ्टवेअरमधील ग्लिच, हिवाळ्यामुळं वेळापत्रकातील बदल, वातावरण या कारणामुळं फ्लाईट रद्द कराव्या लागल्याचं कारणं सांगितलं गेलं. मात्र, हवाई उद्योगातील जाणकारांच्या मते फ्लाईट रद्द कराव्या लागण्याचं प्रमुख कारण फ्लाईट ड्यूटी टाईम लिमिटेशनची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यानं ही समस्या निर्माण झाली. एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं पायलट आणि क्रू मेंबर्सच्या विश्रांतीचे आणि कामाचे तास निश्चित करण्यात आले होते.
FDTL च्या अंमलबजावणीमुळं काय बदललं?
एफडीटीएलचे नियम जानेवारी 2024 मध्ये आणले गेल होते. मात्र, त्याची अंमलबजावणी 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरु कऱण्यात आली होती. पायलट आणि क्रू मेंबर्सला पहिल्यांदा आठवड्यात 36 तास सुट्टी असायची ती वाढवून 48 तास करण्यात आली होती. नाईट लँडिंगची संख्या 6 वरुन प्रत्येक आठवड्यात 2 वर आणण्यात आली होती. रात्रीच्या वेळी 8 तास उड्डाणाची मर्यादा घालण्यात आली होती. नाईट ड्युटी विंडो रात्री 12.00 ते पहाटे 6.00 करण्यात आली होती. FDTL नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत वाढवली जाईल असं इंडिगोला वाटलं होतं. मात्र, डीजीसीएकडून मुदतवाढ देण्यात आली नाही. इंडिगोचं नेमकं इथंच चुकलं आणि मोठा गदारोळ झाला अखेर डीजीसीएला पायलट आणि क्रू मेंबर्सच्या साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घ्यावा लागला.
एफडीटीएलच्या अंमलबजावणीमुळं इंडिगोच्या मोठ्या प्रमाणात पायलटला आवश्यक सुट्टी देण्यात आली होती. एअरबस A320 च्या सॉफ्टवेअर अपडेशन मुळं वीकेंड लांबला, विमानाची उड्डाणं लांबली. उशिरा उड्डाण झाल्यानं अनेक पायलटची ड्यूटी नाईट विंडोमध्ये गेली. त्यामुळं सोमवारी एफडीटीएल लागू झाल्यानं क्रू मेंबर्स ऑटोमेटिक अनिवार्य रेस्टवर गेले. मोठ्या संख्येनं क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यानं इंडिगोचं वेळापत्रक कोलमडलं. विंटर शेड्यूल 26 ऑक्टोबरपासून वाढल्यानं फ्लाइटसची संख्या वाढली, यामुळं अडचणी वाढल्या.
इंडिगोनंकडून 2200 फ्लाईट एका दिवसात चालवल्या जातात, एअर इंडियाच्या ही दुप्पट संख्या आहे. नियोजनातील त्रुटींमुळं मोठी समस्या निर्माण झाली. 10 टक्के फ्लाईट रद्द कराव्या लागल्या तरी ती संख्या 200-400 फ्लाईट रद्द होतात, ज्यामुळं प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास करावा लागतोय. दिल्लीतील 135 उड्डाणं आणि 90 लँडिंग रद्द करण्यात आली आहेत. बंगळुरुत 52 लँडिंग आणि 50 उड्डाणं रद्द करण्यात आली. गेल्या 48 तासात 600 हून अधिक फ्लाईट रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
डीजीसीएकडून इंडिगोला दिलासा
डीजीसीएनं 1 नोव्हेंबरपासून जी एफडीटीएळ नियमावली लागू करण्यात आली होती मात्र सध्याची स्थिती पाहता साप्ताहिक सुट्टी संदर्भातील नियम मागं घेण्यात असल्याचं जाहीर केलं. इंडिगोनं पुढील 48 तासात सर्व परिस्थिती नियंत्रणात येईल असं सांगण्यात आली आहे. इंडिगोच्या टीम चोवीस तास काम करत असून प्रवाशांची गैरसोय रोखण्याचा प्रयत्न केला जातोय, असं इंडिगोनं सांगितलं.
