IndiGo : पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द
इंडिगो एअरलाईनमुळे पुणे, मुंबई, कोलकाता आणि दिल्ली (Delhi) विमानतळावरुन प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांची कालपासून मोठी गैरसोय झाल्याचं पाहायला मिळत असून इंडिगो विमानाचे (Airport) बुकींग असलेल्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसला आहे. कारण, इंडिगो (Indigo) विमान कंपनीने तब्बल 200 उड्डाणे पुणे आणि दिल्ली येथून रद्द केली असून आता अधिकृत पत्र देखील जारी केले आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली विमानतळ येथून निघणाऱ्या इंडिगोचे रात्री 11:59 वाजेपर्यंत सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती इंडिगोकडून अधिकारिकरित्या देण्यात आली आहे. इंडिगोकडून या पत्रात प्रवाशांना झालेल्या मनस्थापाबद्दल माफीनामा देखील सादर करण्यात आला आहे.
दिल्ली विमानतळावरून 5 डिसेंबर 2025 रोजी (DEL) निघणाऱ्या सर्व इंडिगो देशांतर्गत विमानांची उड्डाणे रात्री 11.59 पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या अनपेक्षित निर्णयाचा गंभीर फटका बसलेल्या आमच्या सर्व मौल्यवान प्रवासी, ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो, असे इंडिगोने जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
इंडिगो विमानाचे बुकींग असलेल्या आमच्या सर्व प्रवाशांना आम्ही त्यांना अल्पोपहार, त्यांच्या पसंतीनुसार पुढील उपलब्ध उड्डाण पर्याय, हॉटेल निवास, त्यांचे सामान परत मिळविण्यात मदत आणि लागू असल्यास पूर्ण परतफेड देत आहोत. तसेच, दिल्लीहून आज उड्डाण करणाऱ्या सर्व प्रवाशांना सामान संकलनाबाबत मार्गदर्शनासाठी दिल्ली विमानतळावरील आमच्या ग्राउंड स्टाफशी संपर्क साधण्याची विनंती करण्यात येत आहे. आमच्या वेबसाइटला सर्व प्रवासी https://www.goindigo.in/refund.html भेट देऊ शकतात किंवा मदतीसाठी आमच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधू शकतात. प्रवाशांना होणारी मोठी गैरसोय आणि त्रास आम्हाला समजत आहे, गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगीर आहोत, असे इंडिगोच्या प्रवक्त्यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, आमच्या वेबसाइटला काल गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना इंडिगोला करावा लागला असून गंभीर परिणाम देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर झाला. 200 उड्डाणे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर रद्द करण्यात आल्याने विमानतळाची स्थिती रेल्वे स्टेशनसारखी झाली. त्यामुळे लेकरा बाळांना घेऊन विमानतळावर बसण्याची वेळ प्रवाशांवर आली.
नाशिकमध्येही विमानांचे उड्डाण रद्द
इंडिगो विमान कंपनीच्या माध्यमातून अनेक फ्लाईट कॅन्सल झाल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली आहे. सकाळी इंडिगोची 9 वाजताची विमानसेवानाशिकच्या ओझर विमानतळावरुन रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना विमानतळावर गेल्यानंतर मिळाली. नाशिकचे काही व्यावसायिक व्यवसायाच्या कामानिमित्त दिल्लीला जाणार होते. मात्र, त्यांना खोळंबलेल्या विमानसेवेमुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. आता ते पुन्हा ओझरहून नाशिकला आले असून आता नाशिकहून मुंबईकडे जाऊन दिल्ली प्रवास करणार आहेत. मात्र, अचानक इंडिगो विमानसेवेमुळे या प्रवाशांची मोठी अडचण झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. व्यावसायिक कामासाठी जावं लागणार असल्याने आर्थिक नुकसान देखील या प्रवाशांच झालं आहे.
