विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी: दहावी-बारावी परीक्षांचे अपडेट्स आता मोबाईलवर!
दहावी बारावी या दोन्ही परीक्षा महत्वाच्या आहेत. या परीक्षांची मुलांप्रमाणे पालकांना देखील चिंता असते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक, प्रारूप प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका आणि अन्य माहिती आता विद्यार्थी-पालकांना अॅपवर उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (राज्य मंडळ) या मोबाइल अॅपची निर्मिती केली आहे. गेल्या काही वर्षांत दहावी, बारावीच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले आहेत. या चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांना नेमकी आणि अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्य मंडळाच्या ‘एमबीएसएसई’ या मोबाइल अॅपची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्य मंडळाचे संकेतस्थळ असले तरी सध्याच्या काळात मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. ही बाब लक्षात घेऊन स्वतंत्र मोबाइल अॅप उपयुक्त ठरू शकते. गुगल प्ले स्टोअरवरून, राज्य मंडळाच्या संकेतस्थळावरील दुव्याद्वारेअॅप विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.
एमएसबीएसएचएसई अॅप
गुगल प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध. विद्यार्थी, शाळा व कर्मचाऱ्यांना या अॅपवर लॉगईंन करता येणार आहे. नमुना प्रश्नपत्रिका, वेळापत्रक, निकाल यासह सर्व बाबींचा समावेश करण्यात आला आहे. फी परतावा, अंतर्गत व प्रात्यक्षिक परीक्षा गुणांसह अन्य सुविधा शाळांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य नवीन सर्वसाधारण माहिती सर्वांसाठी लॉगीनशिवाय उपलब्ध करून देण्यात आली आहे.