IPL स्टार वैभव सूर्यवंशी इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सज्ज; BCCI कडून खास प्रशिक्षण
IPL मधील तुफानी खेळीने चाहत्यांच्या मनात ठसा उमटवणारा तरुण क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी, आता इंग्लंडच्या भूमीवरही आपली आक्रमक फलंदाजी दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. इंग्लंड दौऱ्यातील त्याच्या धमाकेदार खेळीने गोऱ्या प्रेक्षकांसह माजी क्रिकेटपटूंनाही थक्क केले. अनेकांच्या मते, वैभव हा भारताचा पुढील स्टार फलंदाज ठरू शकतो. इंग्लंड दौरा संपवून वैभव नुकताच भारतात परतला आणि त्याच वेळी त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (BCCI) फोन आला. 10 ऑगस्टपासून तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकॅडमी (NCA) मध्ये घाम गाळत असून, वरिष्ठ क्रिकेटपटूंची जागा भरण्यासाठी त्याला खास प्रशिक्षण दिले जात आहे.
वरिष्ठ खेळाडूंच्या जागेसाठी नवोदितांची तयारी
BCCIच्या नियोजनानुसार, वरिष्ठ खेळाडूंच्या हळूहळू होणाऱ्या निवृत्तीमुळे निर्माण होणाऱ्या रिक्त जागांसाठी नव्या दमाचे खेळाडू तयार करण्याची मोहीम सुरू आहे. मायखेलच्या अहवालानुसार, वैभव सूर्यवंशीसह अनेक प्रतिभावंत तरुणांना ‘मोती’ म्हणून ओळखले जात असून त्यांना चमकण्याची संधी दिली जात आहे. या प्रशिक्षण शिबिरात केवळ तांत्रिक कौशल्यच नव्हे, तर सामन्यांमधील कठीण परिस्थिती हाताळण्याचे मानसिक धैर्य, निर्णयक्षमता आणि तणाव व्यवस्थापन यावरही भर दिला जात आहे. वैभवने या आधी राजस्थान रॉयल्स संघासोबत विशेष प्रशिक्षण घेतले असून, आता त्याची तयारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील आव्हानांसाठी केली जात आहे. त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी सांगितले की, “नवीन दमाचे खेळाडू हे राष्ट्रीय संघाच्या भविष्यातील कणा असतात आणि वैभव आता त्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनला आहे.”
रोहित-विराटच्या निवृत्तीच्या चर्चेत वाढ
दरम्यान, भारतीय क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी यंदा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. दोघांनाही 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळायची इच्छा असली तरी त्यासाठी तंदुरुस्ती टिकवावी लागेल. BCCIच्या सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात एकदिवसीय मालिकेत विराट आणि रोहित दिसतील, मात्र ही त्यांची शेवटची ODI मालिका ठरू शकते.
BCCI आता आशिया कप आणि 2026 मधील T-20 विश्वचषक यावर लक्ष केंद्रित करत असून, नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. वैभव सूर्यवंशी बंगळुरूमधील सराव पूर्ण केल्यानंतर भारताच्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय शिबिरात दाखल होणार आहे. तरुणाईतील हा उदयोन्मुख तारा भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील विश्वासाचा किरण मानला जात असून, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची चमक पुन्हा पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.