Mumbai Attack Threat : मुंबईवर घोंगावत आहे दहशतवादी हल्ल्याचं मोठं संकट ?
महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सध्या पालिका निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सगळेच पक्ष, आपापल्या उमेदवारासाठी प्रचारात मग्न आहेत. मात्र देशाचा आर्थिक कणा असलेल्या मुंबईवरअसं असतानाच पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचं मोठं संकट घोंगावत आहे. मुंबईवर पाकिस्तानी वक्रदृष्टी पुन्हा पडली आहे. त्यामुळे मुंबईला पुन्हा एकदा हाय अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईमध्ये नियोजित हल्ला होणार असल्याचा संशय असून सर्व सुरक्षा एजन्सींना सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या पाठिंब्याने दहशतवादी हल्ल्याची योजना आखली जात आहे असा अहवाल गुप्तचर संस्थांनी दिला आहे. सुरक्षा यंत्रणांना काश्मीर किंवा महाराष्ट्रातून स्फोटकांसह आयएसआय समर्थित हल्ल्याची योजना सुरू असल्याचा उल्लेख जारी केलेल्या पत्रात आहे. त्यामुळे विमानतळे आणि संवेदनशील जागांची सुरक्षा करणाऱ्या एजन्सींनाही हीच सूचना देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर या सर्व ठिकाणांच्या सुरक्षेत कडेकोट वाढ करण्यात आली आहे.
सतर्क राहण्याचा इशारा
दरम्यान याच सूचनेनंतर मुंबई पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सींनी गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. पोलिसांना सतर्क राहण्यास आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्लीत झालेल्या स्फोटात सुमारे दोन महिन्यांपूर्वी 15 जणांचा मृत्यू झाला होता आणि दोन डझनहून अधिक लोक जखमी झाले होते. अशा वेळी मुंबईत संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये अचानक स्फोट झाला. आत्मघातकी दहशतवादी डॉ. उमर यानेच हा स्फोट घडववल्याची माहिती उघड झाली होती. त्यामध्ये त्याचा तर मृत्यू झालाच पण उतर अनेक निष्पाप नागरिकांचाही बळी गेला.
दिल्ली स्फोटात निष्पापांचा मृत्यू
दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचा आघात इतका शक्तिशाली होता की त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आणि घटनास्थळाजवळ विद्रूप मृतदेह आणि विखुरलेल्या अवशेषांचा खच पडला होता. अनेक जण गंभीर जखमीही झाले. फॉरेन्सिक तपासणीनंतर, या कारच्या चालकाची एनआयएने ओळख पटवली. त्याचे नाव डॉ. उमर उन नबी असल्याचे समोर आले. हाँ दहशतवादी डॉक्टर मूळचा काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता आणि फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात जनरल मेडिसिन विभागात सहाय्यक प्राध्यापक होता.
दहशतवादविरोधी यंत्रणेने दहशतवादी डॉ. नबीचे आणखी एक वाहन जप्त केले. पुराव्यांसाठी या वाहनाची तपासणी सुरू आहे. 73 साक्षीदारांची एनआयएने आतापर्यंत या प्रकरणात चौकशी केली आहे, ज्यात स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे. दिल्ली पोलिस, जम्मू आणि काश्मीर पोलिस, हरियाणा पोलिस, उत्तर प्रदेश पोलिस आणि इतर एजन्सींच्या सहकार्याने एनआयए राज्यांमध्ये तपास सुरू आहे.
