Rohit Pawar : अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का? रोहित पवारांचा सवाल... .

Rohit Pawar : अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का? रोहित पवारांचा सवाल... .

राज्य सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute)दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का?

  • मुख्यमंत्र्यांनी व्हीएसआयच्या चौकशीचे आदेश देताच

  • भाजपने मोर्चा बारामतीकडे वळवला की काय?

राज्य सरकारकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला (Vasantdada Sugar Institute)दिले जाणारे अनुदान ठरलेल्या उद्देशासाठीच वापरले जाते का, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीने याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन महिन्यांच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या साखर आयुक्तांना देण्यात आले आहेत. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या नियामक मंडळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील आणि जयप्रकाश दांडेगावकर यांचा समावेश आहे. त्यामुळे या चौकशीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत रोहित पवार म्हणाले की, अनेक उदाहरणं पुराव्या सकट आम्ही सरकार समोर आणलेली आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री काहीच चौकशी लावत नाहीत. संतोष देशमुख, महादेव मुंडे, हगवणे प्रकरणाच्या बाबतीत न्याय नाही. व्हीएसआय संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत खूप चांगलं काम शेतीविषयक झालेले आहे. सहकार क्षेत्र महाराष्ट्रात का भक्कम आहे तर त्याचे महत्त्वाचे कारण व्हीएसआय आहे. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्हीएसआयमध्ये आतापर्यंत खूप चांगले काम केले गेले आहे. अजितदादांचा सुद्धा फार मोठा वाटा या व्यवस्थेत असतो. तिथे पक्षाच्या पलीकडे जाऊन लोक आहेत. सर्व पक्षाचे लोक व्हीएसआयमध्ये काम करतात.

कालच अमित शाह बोलले आम्हाला कुबड्यांची गरज नाही. याआधी ठाण्याला टार्गेट केले गेले होते. ठाण्याची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता अजितदादा व्हीएसआयमध्ये आहेत म्हणून कुठेतरी भाजपने मोर्चा बारामतीकडे वळवला की काय? असे आपल्याला म्हणावे लागेल. पण हे हास्यास्पद आहे. चौकशी करायची असेल तर बाकीच्या विषयांमध्ये करा. अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आम्ही पुढे आणलेले आहेत. त्याबाबतीत माप मात्र तोंडावर बोट आणि नको त्या विषयांवर चौकशी लावतात, असे रोहित पवारांनी म्हटले.

रोहित पवार पुढे म्हणाले की, व्हीएसआय हे एक ट्रस्ट आहे. व्हीएसआयमध्ये केलेल्या कामाची आजपर्यंत सगळ्यांनीच प्रशंसा केली आहे. मोदी साहेब स्वतः तिथे कार्यक्रमाला आले होते. पंतप्रधान जेव्हा तिथे येतात तेव्हा त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या कार्यालयाचा अभ्यास त्या संस्थेबाबत खूप झालेला असतो. मात्र आता या लोकांच्या काय पोटात दुखत आहे? हे मला माहिती नाही. अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर, भाजपचे वृत्ती वापरा आणि फेकून द्या अशीच आहे. आता तेच कुठेतरी होताना दिसत आहेत. कुबड्या नको, असे अमित शाह यांनीच काल मुंबईत येऊन सांगितले. आता कुबड्या म्हणजे हे दोन पक्ष आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात अजितदादा आणि शिंदे यांच्याकडे लोक देखील राहणार नाहीत. पक्षही राहणार नाही, अशी परिस्थिती या दोघांची होईल की काय? असे देखील रोहित पवार यांनी म्हटले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com