Sushma Andhare यांच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी? अंधारे बैठकीला येताच चंद्रकांत मोकाटेंचा काढता पाय
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर मविआमधील घटक पक्षांनाही आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याची लढाई सुरू झाली आहे. राज्यामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मविआतील घटक पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मात्र, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांतर्गत नाराजी असल्याचं चित्र तयार झालं आहे.
दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वबळावर लढणार आहे. मात्र, स्वबळावर लढण्याचा निर्णय फक्त मुंबई पुरता असल्याचं खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. स्वबळावर लढणार याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली किंवा संपली असा होत नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं. तर मागील निवडणुकीत आमचा पराभव झाला. मात्र, त्यासाठी आता थांबून चालणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी? पसरली आहे का हा सवाल उपस्थित झाला आहे. कारण अंधारे बैठकीला येताच चंद्रकांत मोकाटे यांनी काढता पाय घेतला. शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत, आमदार सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक सुरू होती. यावेळी सुषमा अंधारे येताच मोकाटे तडकाफडकी निघून गेले.
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची महत्त्वाची प्रतिक्रिया
माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना विचारले असता त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. 'सुषमा अंधारे बैठकीला पोहचल्यावर बसायला जागा नव्हती. मी माझी खुर्ची त्यांना दिली आणि माझं निघून आलो, त्या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या मंचावरच बसणार ना?' अशी खोचक प्रतिक्रिया मोकाटे यांनी दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
कोण आहेत चंद्रकांत मोकाटे?
चंद्रकांत मोकाटे यांनी भाजपच्या चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कोथरूड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली आहे. ते शिवसेनेचे माजी आमदार आहेत. ठाकरे गटातील काही उरलेल्या नेत्यांपैकी ते सर्वात जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे मोकाटे यांच्या नाराजीची पुणे शिवसेनेच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

